रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुटुंबशाहीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
पती-पत्नी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, दीर-जाऊ असे रक्ताचे नातेवाईक रिंगणात उतरल्यानं निवडणूक रंगतदार झाली आहे.
महत्च्या पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्या देखील या कुटुंबशाहीच्या स्पर्धेत उतरल्याने वातावरण आणखी तंग झाले आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून प्रचार थांबण्यास अवघे काहीच तास उरले आहेत. जिल्ह्यात महायुती महाआघाडीबरोबरच अन्य पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी मैदान तापवण्यास सुरूवात केली आहे, यादरम्यान आता ही निवडणूक घराणेशाहीची असल्याचा वाद सुरू झाला होता. मात्र कोकणात ही निवडणूक कुटुंबशाहीसाठी चर्चेत आली आहे. येथे विविध नगर परिषद आणि नगरपचायतींच्या निवडणुकीत रक्ताची नातीच निवडणूक लढवत असून कुठे पती-पत्नी, आई-मुलगा, बहीण-भाऊ, दीर तर 'जाऊबाई' निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेच्या एकूण १६ प्रभागांतून ३२ उमेदवार निवडले जाणार असून येथे महायुतीली शिंदेंची शिवसेना-भाजप, दोन्ही राष्ट्रवादीतील एक गट आणि महाविकास आघाडीतील उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा आघाड्या झाल्या आहेत. येथे पती-पत्नी आणि आई मुलगा निवडणुकीच्या मैदानात उतरले असून माजी नगरसेविका वैभवी खेडेकर आणि त्यांचे पती विजय खेडेकर निवडणूक लढवत आहेत. माजी नगरसेविका उज्ज्वला शेट्ये पुन्हा मैदानात असून माजी नगरसेविका कौसल्या शेट्ये यांचे पती केतन शेट्ये निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आई राष्ट्रवादीतून तर मुलगा ठाकरेंच्या शिवसेनेतून आपले नशीब आजमावत असल्याचे समोर येत आहे.
आई व मुलगा निवडणुकीच्या रिंगणात
राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीतही आई व मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाऊ-बहीणेही दंड थोपाटले आहेत. येथे माजी आमदार हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदासाठी आणि त्यांचा मुलगा जमीर खलिफे हा नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत. तसेच सौरभ खडपे आणि त्यांची बहीण उर्मिला अमोल बाकाळकर यांनी उमेदवारी मिळाली आहे.
'जाऊबाई'ची चर्चा
नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली असून येथे एकाच कुटुंबातील जावा वेगवेगळ्या पक्षांतून रिंगणात आहेत. ओझरवाडी परिसरातील प्रभाग १३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं पल्लवी मोहन महाडिक तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं श्वेता शेखर महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. येथे दुसरा उमेदवार नसल्याने जाऊबाईंमध्ये थेट लढत होत आहे. याशिवाय दोन मामे भाऊ, दोन चुलत भाऊही उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
लांजात मुलगी, आई, दीर यांना संधी
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बंडखोरीचे निशाण फडकवले असून कुवे- लांजा संघटनेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारांनी रणशिंग फुकले आहे. या निवडणुकीत आई, मुलगी, दीर, पती-पत्नी यांना संधी देण्यात आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्रियांका संजय यादव यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या आई वंदना रामचंद्र काटगाळकर, दीर किशोर तुकाराम यादव हे नगरसेवकपदाची निवडणूक लढवत आहेत. तसेच शीतल चंद्रशेखर सावंत आणि त्यांची मुलगी अवंतिका चंद्रशेखर सावंत ही रेसमध्ये आहेत. मिलिंद मनोहर लांजेकर आणि त्यांची पत्नी मधुरा मिलिंद लांजेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
देवरुखात सासू-सून, जावा-जावा
जिल्ह्यात एकीकडे पती-पत्नी, आई-मुलगा, बहीण-भाऊ, दीर तर 'जाऊबाई' निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत. तेथे संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत चुलत जावा-जावा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. तर चुलत सासू-सून एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभ्या आहेत. श्रावणी घडशी (अपक्ष), प्राची भुवड (राष्ट्रवादी अजित पवार), शर्मिला भुवड (उद्धवसेना) असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
प्राची भुवड व शर्मिला भुवड या नात्याने जावा-जावा असून प्राची भुवड या माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांच्या पत्नी आहेत. तर शर्मिला भुवड या काँग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र भुवड यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर नेहा आंबेकर शिवसेना (शिंदेसेना) आणि मनस्वी आंबेकर व स्मिता लाड हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून नेहा आंबेकर व मनस्वी आंबेकर या नात्याने सासू-सून आहे. आता दोन दिवसानंतर मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी निकाल लागणार आहे. यामुळे जावा-जावांसह सासू-सून यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.
गुहागरमध्ये पती-पत्नी, पिता-पुत्र
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत पती-पत्नी, पिता-पुत्र आपले नशीब अजमावत आहेत. येथे चार वेगवेगळ्या प्रभागांतून नवरा-बायको व पिता-पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असू शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र अर्जुन भागडे यांना संधी देण्यात आली आहे. याच प्रभागातून त्यांचे सुपुत्र सौरभ राजेंद्र भागडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता.
त्यामुळे एकाच प्रभागात पिता-पुत्राचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार होता. शेवटच्या क्षणी सौरभ भागडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला व हा पिता-पुत्राचा संघर्ष टळला. पण त्यांनी प्रभाग १४ मधून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने एका प्रभागात वडील व एका प्रभागातून मुलगा वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहे. याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पती-पत्नी निवडणूक रिंगणात असून रिद्धी प्रवीण रहाटे व प्रवीण प्रकाश रहाटे निवडणूक लढवत आहेत.
खेडमध्ये चार दापंत्य रिंगणात
खेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत चार दांपत्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सपना ऋषिकेश कानडे रिंगणात आहेत. त्यांचे पती ऋषिकेश मनोहर कानडे हे नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. ऋषिकेश कानडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष असून सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. याचवेळी ओंकार विलास कुलकर्णी हे निवडणूक लढवत असून त्यांची पत्नी रूपाली ओंकार कुलकर्णी याही मैदानात आहेत.
माजी नगरसेविका सुरभी सुनील धामणस्कर या निवडणूक रिंगणात असून त्यांचे पती सुनील मनोहर धामणस्कर हे देखील मैदान मारण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक बशीर मुजावर आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कौसर बशीर मुजावरही निवडणूक रिंगणात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनिल रामचंद्र सदरे यांची पत्नी अपेक्षा अनिल सदरे निवडणूक लढवत आहेत.
अशा पद्धतीने जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकींच्या मैदानात रक्तातील नात्यातील लोकच निवडणुक लढवत असल्याने कोण बाजी मारणार हे आता पुढच्या आठवड्यात होणाऱ्या प्रत्यक्ष मतदान आणि निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.
कारण अनेक उमेदवार एकाच कुटुंबातील असून पती-पत्नी, आई-मुलगा, भावंडे अशा नात्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आहे.
कारण कुटुंबातील सदस्य सतत निवडणुकांमध्ये उतरून राजकीय वारसा टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.
पती-पत्नी, आई-मुलगा, बहीण-भाऊ, दीर-जाऊ असे अनेक नातेवाईक या वेळेस रिंगणात आहेत.
होय, कारण एकाच पक्षात किंवा प्रतिस्पर्धी गटांमध्येही नातेवाईक समोरासमोर येत आहेत.
काही मतदार हे नातेसंबंध राजकारणावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न मानतात, तर काहींना ते स्थानिक प्रभावाचे लक्षण वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.