Shivsena UBT-NCP alliance; shekhar nikam bhaskar jadhav sarkarnama
कोकण

Shivsena UBT-NCP alliance : कोकणात राजकारणाचा नवा पॅटर्न, विरोधात लढलेले निकम-जाधव एकत्र येणार?

shekhar nikam bhaskar jadhav alliance : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समितीची निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरली.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समिती निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

  2. दोन शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चिपळूण तालुक्यात आपली ताकद दाखवली.

  3. महायुतीत स्थान न मिळाल्यामुळे आमदार शेखर निकम हे भास्कर जाधव यांच्याशी आघाडीची चर्चा करू शकतात, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समितीची निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरली. दोन शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चिपळूण तालुक्यात आपली ताकद दाखविली. तालुक्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्तेसाठी प्रमुख पक्षांना एकमेकांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

चिपळूण तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत राहिली आहे. मध्यंतरी या दोन्ही पक्षांची विभागणी झाल्यानंतर सत्ताधारी शिंदेसेना आणि भाजपने तालुक्यात जम बसवायला सुरुवात केली आहे. भाजपने २०२९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला संधी मिळेल, या अपेक्षेने महायुतीतील मित्रपक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तयारीने उतरले होते.

अजित पवारांची राष्ट्रवादी राज्याच्या आणि केंद्रात सत्तेत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी आघाडीचा हात पुढे करून राजकीय गणिते जुळविण्याचा प्रयत्न केला.

परंतु जागा वाटपात दोघांचे सूर जमले नाहीत आणि दोघांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. हे दोघे निवडणुकीपूर्वी एकत्र आले असते, तर निकालाचे चित्र कदाचित आघाडीच्या बाजूने झुकले असते. हक्काच्या कार्यकर्त्यांसाठी कोणाशीही तडजोड करायची नाही, असा दोन्ही नेत्यांचा स्वभाव असल्यामुळे आमदार जाधव आणि निकम यांची आघाडी होऊ शकली नाही. भास्कर जाधव यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे नव्हती. त्यामुळे त्यांनी चिपळूणमध्ये फारसे लक्ष घातले नाही; परंतु त्यांच्या गुहागर मतदारसंघात येणाऱ्या जागांवर यश मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

चिपळूण पालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक कामगिरी करता आली नाही; परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळाले. पंचायत समितीमध्ये १८ पैकी सात सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले. सभापती निवडण्यासाठी निकम यांच्या पक्षाला तीन सदस्यांची गरज आहे. जो पक्ष सभापतिपदासाठी पाठिंबा देईल त्यांचा पाठिंबा घेऊ, असे निकम यांनी सांगितले आहे.

'कमळा'ची नव्याने पेरणी

२०११ पर्यंत रामपूर जिल्हा परिषद गटातून भाजपचा उमेदवार निवडून येत होता. भास्कर जाधव गुहागरमध्ये गेल्यानंतर त्यांनी रामपूरमधील भाजपची मक्तेदारी मोडून काढली. त्यानंतर भाजपने कधीही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळविले नाही. परंतु भाजप नेते प्रशांत यादव यांना पक्षाने बळ दिल्यानंतर त्यांनी चिपळूण पंचायत समिती आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य निवडून पाठविले. भाजपने पंचायत समितीच्या सात आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा लढविल्या. पंचायत समितीमध्ये भाजपचे काही उमेदवार काठावर पराभूत झाले; परंतु २०२९ च्यादृष्टीने भाजपचे कमळ हे चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात प्रशांत यादव यांनी सुरुवात केली आहे.

FAQs :

1. चिपळूणमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले का?
नाही, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

2. कोणकोणते पक्ष प्रमुख ठरले?
दोन शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली.

3. शेखर निकम यांच्याबाबत कोणती चर्चा आहे?
महायुतीत स्थान न मिळाल्यामुळे ते भास्कर जाधव यांच्याशी आघाडीबाबत चर्चा करू शकतात, अशी चर्चा आहे.

4. पुढे काय राजकीय घडामोडी होऊ शकतात?
सत्तेसाठी प्रमुख पक्षांमध्ये हातमिळवणी आणि नव्या आघाड्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

5. या निकालाचा तालुक्यावर काय परिणाम होईल?
सत्तास्थापनेसाठी तडजोडी आणि आघाड्या आवश्यक ठरणार असल्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT