ZP election  sarkarnama
कोकण

ZP Election : ग्रामविकास विभागाचा आदेश निघताच हालचालींना वेग; सभापतिपदासाठी भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच अन् लॉबिंग सुरू

Zilla Parishad President Election : ग्रामविकास विभागाने 12 जिल्हा परिषदांना 20 मार्चपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेग आला आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया 20 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  2. अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला जाण्याची शक्यता असून चिपळूणला महिला बालविकास व शिक्षण सभापतिपद मिळू शकते.

  3. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला आणि भाजपला सत्ता स्थापनेत किती संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Chiplun News : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या असून २ आठवडे उलटल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी हालचाली झाल्या नव्हत्या. पण आता ग्रामविकास विभागाने या जिल्हा परिषदांना 20 मार्चपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या राहिल्या होत्या.

दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. चिपळूण तालुक्याला महिला बालविकास आणि शिक्षण खात्याचे सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कोणत्या जिल्हा परिषद सदस्याची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला संधी मिळणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. भाजपला २० वर्षांनंतर चिपळूण तालुक्यात यश मिळाले असून भाजपच्या दोन जागा चिपळूण तालुक्यातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता सभापतिपद मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची लॉबिंग सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समितीची निवडणूक शिवसेना-भाजप युती म्हणून लढवण्यात आली. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नव्हते, मात्र आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीच्या सात आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या. चिपळूण पंचायत समितीत सभापती बसवण्यासाठी जो सहकार्य करेल, त्याचा पाठिंबा घेणार, असे आमदार शेखर निकम यांनी जाहीर केल्यानंतर ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती.

मात्र काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम एकत्र आले. त्यावेळी ठाकरे गटाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद हवे आहे.

भाजपने प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी देखील सभापतिपद तसेच नियोजन समितीमध्ये प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे सेनेचे काही सदस्य जिल्हा नियोजन समिती किंवा सभापतिपद मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत सव्वा वर्षासाठी सभापतिपद दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांना न्याय मिळेल. पहिल्या टर्ममध्ये कोणाला संधी मिळेल, हे वरिष्ठ ठरवतील. चिपळूण पंचायत समितीत शिवसेनेला काय मिळेल आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काय मिळेल, हेही वरिष्ठ ठरवणार आहेत.
-विनोद झगडे, सदस्य, चिपळूण पंचायत समिती

FAQs :

1. निवड प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करायची आहे?
20 मार्चपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

2. अध्यक्षपद कोणत्या तालुक्याला मिळण्याची शक्यता आहे?
मंडणगड तालुक्याला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.

3. चिपळूण तालुक्याला कोणते पद मिळू शकते?
महिला बालविकास आणि शिक्षण खात्याचे सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे.

4. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असू शकते?
सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

5. भाजपला संधी मिळेल का?
सत्तास्थापनेच्या समीकरणांवर अवलंबून भाजपलाही महत्त्वाची संधी मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT