

Mumbai News : राज्यातील 12 जिल्हा परिषदेतील मतमोजणी होऊन 15 दिवसाचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, निवडून आलेल्या उमेदवारांची नावे अधिकृत राजपत्रात (Gazette) प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण होत आहे. त्यानंतर लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावली जाण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेला आता सोमवारपासून (23 फेब्रुवारी) वेग येणार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे.
राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी आणि धाराशिव या 12 जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी झाली. त्यानंतर गेल्या 15 दिवसापासून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण होत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारपासून विशेष सभा बोलावली जाईल. या सभेच्या अध्यक्षतेसाठी विभागीय आयुक्तांमार्फत पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय हालचालीना वेग आला आहे.
नुकत्याच निवडणूका पार पडलेल्या अनेक जिल्ह्यांत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी सुरू झाली आहे. विशेषतः निवडणुका झालेल्या अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena), अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वच जिल्हा परिषदेत महायुतीचे एकत्रित पारडे जड आहे. सांगली जिल्हा परिषद वगळता महाविकास आघाडीला सत्तेसाठी इतरत्र फारसी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडताना महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रशासकीय पातळीवर हालचालीना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद अध्यक्ष (Zilla Parishad) आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभांचे नियोजन पूर्ण झाले असून पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती सुरू झाली आहे. प्रशासनाने सर्व जिल्हा मुख्यालयी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सभास्थळी सीसीटीव्ही निगराणीची तयारी पूर्ण केली आहे, जेणेकरून सत्ता स्थापनेच्या वेळी कोणताही राडा होणार नाही.
झेडपी पदाधिकारी निवडीसाठी पुढील टप्पे महत्त्वाचे :
नवनिर्वाचित सदस्यांच्या निवडीचे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 30 दिवसांच्या आत पहिली सभा बोलावली जाते. या सभेत हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली जाते. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.