Shivsena
Shivsena Sarkarnama
कोकण

शिवसेना उपमहापौराच्या पतीकडून रिक्षाचालकांना मारहाण

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : ठाणे जिल्ह्यात ‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट लागले असून, शहरात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण केल्याचे व्हिडीओ आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. शिवसेनेच्या ठाण्यातील उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम आपल्या कार्यकर्त्यांसह स्थानक परिसरात रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. (Rickshaw driver beaten by Shiv Sena's deputy mayor's husband in Thane)

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आताच कुठे आम्ही दुकाने उघडली आहेत. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका काही व्यापाऱ्यांनी घेतली, तर काही ठिकाणी बाजारपेठ आणि अन्य ठिकाणी सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, काल राष्ट्रवादीच्या वतीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. बंदच्या आदल्या दिवशीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करत होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचा दावाही करण्यात आला.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याने ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरले. महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. बंदमुळे ठाण्यात सर्वसामान्यांचे हाल झाले. शिवसैनिकांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. रिक्षाचालकांनाही मारहाण झाली; परंतु ठाण्यातील व्यापारी हे स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

सकाळी टेंभी परिसरात काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत होते. त्या वेळी भाडे जास्त घेऊन नका. नागरिकांना वेठीस धरू नका, असे त्यांना सांगितले; परंतु रिक्षाचालक ऐकत नसल्याने शिवसैनिक संतप्त झाले. त्यांच्याकडून मारहाण झाली. असे असले तरी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, असे माजी नगरसेवक पवन कदम यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने सरकारी यंत्रणेचा बिनदिक्कत बंदसाठी वापर केला. पोलिसांकडून व्यापारी संघटनांना फोन करून दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले. एमआयडीसीकडून उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले जात होते. ‘टीएमटी’ची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. सरकारी आशीर्वादाने सामान्य जनतेचे हाल करण्यात सत्ताधारी धडपडत होते. जनतेच्या हालांकडे दुर्लक्ष केले, अशी टीका भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

भाजप आमदार संजय केळकर म्हणाले की, हा बंद म्हणजे राजकारण आहे. कोरोनानंतर अर्थचक्र सुरू झाले होते, ते पुन्हा बंद करण्याचे काम महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि ठाकरे सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. हे योग्य नाही. गोरगरिबांचे हातावर पोट आहे. एकीकडे कोरोना असल्याचे सांगत असताना दुसरीकडे बंद पुकारण्याची बाब दुर्दैवी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT