Harshal Patil  sarkarnama
कोकण

हर्षल पाटीलच्या आत्महत्याचे पडसाद कोकणात! थकीत बिलांविरोधात रत्नागिरीत कंत्राटदारांनी अधिकाऱ्याला घेरलं

Sangli Contractor Suicide Case : हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले असून मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजीनामा मागितला जात आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर देत टीका केली होती. यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील ठेकेदारांचा एल्गार पाहायला मिळत आहे.

Aslam Shanedivan

बातमीचा थोडक्यात सारांश :

  1. सांगली येथे जलजीवन मिशन योजनेतील सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केली.

  2. या घटनेचे पडसाद चिपळूण तालुक्यातही उमटले असून, येथील ठेकेदारांनी थकीत बिले मिळेपर्यंत तालुक्यातील सर्व पाणी योजनांची कामे थांबवण्याचा इशारा दिला आहे.

  3. ठेकेदारांच्या या भूमिकेमुळे जलजीवन मिशनच्या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Chiplun News : जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने सांगली येथील एका उपकंत्राटदाराने आत्महत्या केली. हर्षल पाटील असे त्याचे नाव असून या प्रकरणानंतर आता राज्यभर याचे पडसाद उमटले आहे. जिल्ह्या जिल्ह्यात या घटनेवरून कंत्राटदारांनी शासनाच्याविरोधात असहकार भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. सांगलीतील या घटनेचे कोकणात देखील पडसाद उमटले असून चिपळूण तालुक्यातील ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी, थकीत बिले मिळेपर्यंत तालुक्यातील सर्व पाणीयोजनांची कामे थांबवण्यात येतील, असा इशारा दिला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Jal Jeevan Mission Contractor Suicide Sparks Outrage in Konkan: Chiplun Contractors Declare Indefinite Work Stoppage)

जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी हर्षल पाटील याच्या आत्महत्येनंतर आवाज उठवला. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश बुटाला यांची भेट घेत व्यथा मांडली. दशरथ दाभोळकर, आर. जी. कुलकर्णी, संतोष जाधव, राजेश सुतार, योगेश सुतार, तुषार चव्हाण आदींनी थकीत बिले, आर्थिक अडचणी आणि कामकाजावरील ताण या संदर्भात कैफियत मांडली. तसेच हर्षल पाटील याच्या प्रमाणेच आता आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन देखील केले.

जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे 1200 कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही बिले मिळालेली नाहीत, असा आरोप ठेकेदारांनी केला आहे. तसेच बँकांकडून काढलेले कर्ज, त्यावरील वाढणारे व्याज आणि प्रशासनाकडून मिळणारी असंवेदनशील वागणूक यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडल्याचा दावा, यावेळी तालुक्यातील ठेकेदारांनी केला आहे.

या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे; मात्र गेल्या दीड वर्षात केवळ 15 ते 20 टक्के निधी वितरित करण्यात आला असून, उर्वरित देयकांअभावी अनेक कामे अर्धवट पडली आहेत. यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले असून, अनेकांची मानसिक आणि कौटुंबिक घडी विस्कटली आहे. सांगलीतील आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण ठेकेदार वर्गात अस्वस्थता निर्माण केली आहे. ज्याच्याकडून काम करून घेतले त्याला वेळेवर पैसे न दिल्यामुळे त्याला जीवन संपवण्याची वेळ आली. आता आम्हालाही तशीच वेळ येणार का? असा सवाल या ठेकेदारांनी उपस्थित केला.

प्रश्न 1: जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदाराने आत्महत्या का केली?
उत्तर: सांगलीतील ठेकेदाराचे दीड कोटी रुपयांचे बिले सरकारकडून मिळाले नाहीत, त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केली.

प्रश्न 2: या घटनेमुळे कोकणात काय प्रतिक्रिया उमटली?
उत्तर: चिपळूण तालुक्यातील ठेकेदार संतप्त झाले असून त्यांनी सर्व पाणीयोजना थांबवण्याचा इशारा दिला आहे.

प्रश्न 3: या प्रकरणावर सरकारने कोणती कारवाई केली आहे?
उत्तर: अद्याप कोणतीही ठोस सरकारी कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही, परंतु दबाव वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT