Sharad pawar-Bhaskar Jadhav
Sharad pawar-Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

सरकार पुढाकार घेत नसल्याने भास्कर जाधवांची शरद पवारांकडे धाव!

सरकारनामा ब्यूरो

गुहागर : आरजीपीपीएलचे संकटमोचक व्हा, अशी विनंती करण्यासाठी या वीज प्रकल्पाची निर्मिती करणारे अधिकारी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले, त्यासाठी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पुढाकार घेतला. या वेळी पवार यांनी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. (Sharad Pawar take initiative for power generation project : Bhaskar Jadhav)

सध्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाची अवस्था ‘दात आहेत; पण चणे नाहीत,’ अशी झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी आरजीपीपीएल वीज देण्यास तयार आहे, असे सांगत खरेदीदार शोधत होती. तेव्हा एकही राज्य किंवा औद्योगिक महामंडळ वीज खरेदीसाठी तयार झाले नाही. मात्र, उन्हाळ्याने उच्चांकी तापमान गाठल्याने वीजेची मागणी वाढली. देशात निर्माण झालेला कोळशाचा तुटवड्याने औष्णिक वीज प्रकल्पामधील वीज उत्पादनाला मर्यादा आल्या. त्यामुळे विविध राज्ये आता कोणी वीज देता वीज, असे म्हणत नैसर्गिक वायूवर वीज निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडे येत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठतील गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक वर्षांचे करार करूनही गॅस उत्पादन कंपन्या गॅस देत नाहीत. त्यामुळे आरजीपीपीएलला वीज खरेदीदार मिळत असूनही वीज खरेदी करता येत नाही. या संकटातून सोडवणूक झाली तर आरजीपीपीएलला गॅस मिळेल. वीजनिर्मिती सुरू होईल. स्थानिक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येईल. यासाठी आरजीपीपीएलचे अधिकारी केंद्राने मदतीचा हात द्यावा, म्हणून हरप्रकारे प्रयत्न करत आहेत.

अधिकारीही भेटण्यास झाले तयार

आमदार भास्कर जाधव सध्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी आग्रही आहेत. आरजीपीपीएल कंपनी सुरू राहिली तर सध्या बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल, याची जाणीव असल्याने आमदार जाधव यांनी राज्याच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला. मात्र, राज्य सरकार कोणतीही भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे या प्रकल्पाची निर्मिती करणारे तत्कालिन मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यातून मार्ग काढतील, असा पर्याय आमदार जाधव यांनी कंपनीसमोर ठेवला. कंपनीचे अधिकारीही शरद पवारांना भेटण्यास तयार झाले.

नैसर्गिक वायूमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू : पवार

आमदार जाधव यांच्या पुढाकाराने आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन. यांनी शरद पवारांची भेट घेतली. कंपनीची सद्यस्थिती पवारांना सांगितली. त्यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणू, असे आश्वासन पवार यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT