Shivsena Vs NCP politics; Sunil Tatkare And Eknath Shinde sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : रायगडच्या रोह्यात तटकरेंची हुकूमत शिंदेंचा शिलेदार मोडून काढणार? राष्ट्रवादीविरोधात भाजपची शिवसेनेला रसद?

Roha Municipality Elections : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचा धडाका उडाला असून दररोज होणाऱ्या पक्ष प्रवेशांमुळे राजकारणात गोंधळ असल्याचे दिसत आहे.

Aslam Shanedivan

  1. रोहा नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाधिकाराला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

  2. या मोहिमेला भारतीय जनता पक्षाकडून अप्रत्यक्षरित्या पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  3. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव अधिक वाढला आहे.

Raigad News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून गरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या पालकमंत्रीपदावरचा दावा आणि सुरू झालेला वाद आता एका वर्षानंतरही थांबलेला नाही. तर या वादामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेंकावर कुरघोडी करताना दिसत आहेत. दरम्यान रोहा नगरपरिषदेतील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं चंग बांधल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यासह कोकणातील रायगडमध्ये जोरदार राजकीय उलथा-पालथ झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आल्याने येथे महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये घरोबा शोधला. यातील अनेकांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचा मार्ग धरला. तर काहींनी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली. जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच आपल्या सोईचा मार्ग निवडत आहेत. याच संधीचे सोनं करत शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी थेट मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीलाच टार्गेट केल्याचे दिसत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला असून रोहा नगरपरिषदेतील राष्ट्रवादीची हुकूमत मोडीत काढण्याचा चंग दळवी यांनी धरला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना भारतीय जनता पक्षाकडून रसद पुरवली जात असल्याची येथे चर्चा आहे. नुकताच रोहा येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (तटकरे गट) मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून राजकीय समीकरणे ढवळून काढली होती. तर या प्रवेशामुळे तटकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाला मोठा संघटनात्मक फटका बसला असून, स्थानिक पातळीवर असलेल्या त्यांच्या मजबूत नेटवर्कमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाडच्या नाक्यावर जाहीर सभेत तटकरे यांचे खंदे समर्थक माजी सरपंच सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे या प्रमुख राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे देखील येथे तटकरेंना शिवसेनेनं धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

कोकणचे भाग्यविधाते म्हणून घेणाऱ्यांचे बालेकिल्ल्यातील बुरुज ढासळण्यास सुरुवात म्हणत दळवी यांनी रोह्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. ज्यात त्यांच्या उपस्थितीत शेकडो मुस्लिम बांधव आणि महिला भगिनींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. तर शिवसेनेला भक्कम करताना दळवी यांनी मास्टरस्ट्रोक खेळत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांना गळाला लावले. त्यांनी आधी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपला सोडचिठ्ठी देत ते पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाले. जांभळे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने पेण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आप, शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. ज्यानिमित्ताने शिवसेनेनं विरोधी पक्षाला मोठे धोबीपछाड दिल्याचे बोलले जात होते.

दरम्यान आता राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपसह, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा गट), मनसेसह इतर पक्षांकडूनही राष्ट्रवादीविरोधात मोर्चे बांधणी केली जातेय. यासाठी नवख्या उमेदवारांनीही या निवडणुकीच्या रिंगणात घेतलं जात आहे. याच पक्षप्रवेशामुळे रोहा येथील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागत आहे.

FAQs :

1. रोहा नगरपरिषदेतील संघर्षाचे कारण काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने आघाडी घेतली आहे.

2. या मोहिमेत भाजपची भूमिका काय आहे?
भाजपकडून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे.

3. निवडणुकीत कोणते पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप असा तिघांचा सामना होऊ शकतो.

4. या वादाचा स्थानिक निवडणुकीवर काय परिणाम होईल?
राष्ट्रवादीचा पारंपरिक गड डळमळीत होण्याची शक्यता आहे.

5. रोहा येथील राजकीय परिस्थिती सध्या कशी आहे?
राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून शिवसेना आणि भाजप संयुक्त रणनीती आखताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT