Aditya Thackeray, Yogesh Kadam Sarkarnama
कोकण

आदित्य ठाकरेंच्या दोन शब्दांनी आमदार कदमांना मिळालं बळ; परबांना सूचक इशारा?

नगरपंचायत निवडणुकीपासून शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय वादात बुधवारी ट्विस्ट आला. अनिल परब आणि योगेश कदम यांच्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेला आहे.

सरकारनामा ब्युरो

दापोली : नगरपंचायत निवडणुकीपासून शिवसेनेत (Shiv Sena) सुरू असलेल्या राजकीय वादात बुधवारी ट्विस्ट आला. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत गेला आहे. त्यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दापोलीत आले होते. त्यामुळे अवघ्या कोकणचं लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागलं होतं.

दापोली येथे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. पण हा पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेत कदम यांना डावलण्यात आल्याचा आरोप कदम समर्थकांकडून करण्यात आला होता. त्याला नगरपंचायत निवडणुकीचीही पार्श्वभूमी आहे. परब व माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार देत योगेश कदम व रामदास कदम यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चाही रंगली होती.

या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी व्यासपीठावर आल्यानंतर योगेश कदम यांना अपेक्षित असलेला मान दिला. त्यांना काहीवेळ शेजारी बसवून त्यांच्याशी चर्चाही केली. त्याचे फोटोही कदम यांनी ट्विट केले आहेत. तसेच ठाकरे यांनी आपल्या भाषणात कदम यांचा उल्लेख 'माझे मित्र' असा केला. त्यानंतर कदम यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

ठाकरे यांनी आपल्या भाषणात कदम यांनी आपल्याला या कार्यक्रमाचे निमंभण विधिमंडळात भेटून दिल्याचेही सांगितले. पुतळ्याच्या कामाचेही ठाकरे यांनी कौतुक केले. त्यामुळे कदम यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आदित्य ठाकरे यांचे दोन शब्द म्हणजे कदम यांच्या विरोधकांना सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता पुढील काळात दापोलीतील राजकारणाला कोणतं वळण मिळणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

कार्यक्रमात कदमांचे शक्तीप्रदर्शन

त्याचेच पडसाद बुधवारी आदित्य ठाकरे यांच्यासमोरही उमटले. आदित्य ठाकरे कार्यक्रमाच्याठिकाणी व्यासपीठावर येताच कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. योगेश कदम आगे बढो, अशा घोषणा देताना समर्थक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. त्यावरून काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कदम यांनी परब आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना शह देण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.

काय आहे वाद?

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण काही महिन्यांपूर्वी उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश यांना साई़डलाईन करण्यात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते.

योगेश यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे दळवी यांच्या गटाच्या पदाधिकार्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. निवडणुकीवेळी कदम यांनीही शिवसेनेतील काही नेत्यांवर थेट निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला काही नेते मदत करत असल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे परब यांच्यावर निशाणा साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT