दापोली (जि. रत्नागिरी) : जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) या शिवसेनेच्या (Shivsena) दोन नेत्यांमधील वाद पुन्हा समोर आला आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले होते. अखेर परब यांच्या गटाच्या ममता मोरे यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. यामुळे कदम गटाला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे आणि उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मोरेंच्या विरोधात शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी अर्ज केला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस आघाडीवर ठाम राहिल्याने खानविलकर यांचा पराभव झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद अडीच-अडीच वर्षे राहणार आहे.
दापोली (Dapoli) नगरपंचायतीची निवडणूक शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत वादामुळे चर्चेत आली होती. रामदास कदम यांनी शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकवत परब यांना आव्हान दिले होते. त्यामुळे परब यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही या निवडणुकीत जोर लावला होता. राष्ट्रवादीला सोबत घेत परब यांच्याकडून शिवसेनेचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप कदम यांनी केला होता.
निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कदम यांनी उपस्थित केलेली शंका खरी ठरल्याचेच चित्र होते. निवडणुकीत शिवसेनेला सहा तर राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या आहेत. कदम यांच्या शिवसेवा विकास आघाडीला केवळ दोन जांगावर तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. दापोली नगरपंचायतीवर आघाडीची सत्ता आली असली तरी राष्ट्रवादीने मिळवलेले यश शिवसेनेसाठीही इशारा मानला जात आहे. कारण मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळाल्या होता. आता ही संख्या दुप्पट झाली आहे. तर त्यातुलनेत शिवसेनेची एक जागा आता कमी झाली आहे. भाजपलाही एक जागा कमी मिळाली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसलाही चार जागा मिळाल्या होत्या.
कदम आणि परब यांच्या भांडणामध्ये राष्ट्रवादीची सरशी झाल्याने त्याचीच चर्चा अधिक रंगली होती. रामदास कदम यांनी आपल्या गटाचे दोन उमेदवार निवडून आले असले तरी त्यांचे दापोलीतील वर्चस्व संपल्याचीही बोलले जात आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात रामदार कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. त्यामुळे दापोली नगरपंचायत मिळवत परब यांनी योगेश कदम यांनाही थेट इशारा दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.