कोकण

Ajit Pawar death : 'काल संध्याकाळीच आमचं बोलणं झालं, पण आज...'; शिंदेंच्या शिलेदाराची मन सुन्न करणारी पोस्ट

Uday Samant reacts emotionally On ajit pawar death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीला जाताना विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ज्यानंतर राज्यावर दुःख कोसळले असून राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातोय.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून अख्खे राज्य शोक सागरात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस असल्याचे सांगताना अजित पवारांचे जाणे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणे अतिशय कठीण असल्याचे सांगत राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या घटनेनंतर शोक भावना व्यक्त केल्या आहेत. यादरम्यान राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. त्यांनी, काल संध्याकाळीच आमचं बोलणं झालं, पण आज आदरणीय दादा आपल्यात नाहीत, ही बाब मन सुन्न करणारी असल्याचे म्हटलं आहे.

अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी, माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. तर "हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का असून एक कर्तृत्ववान नेता हरपला आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नसून सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

याचदरम्यान उदय सामंत यांनी अजितदादांच्या मृत्यूवर भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये... आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठीही अत्यंत दुःखद आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या समोर मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही बाब मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या पावन स्मृतीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझे आणि अजितदादांचे संबंध हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते आपुलकीचे, घरगुती स्वरूपाचे होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागावायचेही; मात्र तो रागसुद्धा आपुलकीतूनच असायचा. खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या चर्चा होत, ते हक्काने एखादे काम सांगायचे, मार्गदर्शन करायचे आणि योग्य वेळी स्पष्ट शब्दांत मत मांडायचे हेच त्यांचे रोखठोक नेतृत्व होते. काल संध्याकाळी पुणे एमआयडीसीच्या विकासकामांबाबत आमचे फोनवरून सविस्तर बोलणे झाले होते. परंतु आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच मला प्रचंड धक्का बसला. हा आघात शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजितदादांनी मला खूप सहकार्य केले, पाठिंबा दिला. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, अजितदादांनी मला संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी दिली. आणि यामुळेच माझा चेहरा राज्यभर ओळखीचा झाला. माझ्या राजकारणातील गेल्या २५ वर्षात त्यांनी मला मार्गदर्शन, पाठिंबा आणि विश्वास दिला ही माझ्या आयुष्यातील फार मोठी शिदोरी आहे.

उद्योग मंत्री झाल्यानंतर प्रशासन कसे चालवावे, निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही दादांनी अनेक वेळा मला मार्गदर्शन केले. माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली १५–२० वर्षे मी त्यांच्या सोबत काम केली आणि त्यामुळेच आज त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख झाले आहे. अजितदादांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली एक मोठी पोकळी आहे,जी कधीही भरून येऊ शकणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली.... असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT