Rajan Teli alleging Nitesh Rane’s involvement in the Sindhudurg District Bank loan scam Sarkarnama
कोकण

Rajan Teli : राजन तेलींकडून नितेश राणेंवर वार! शिंदेंचा शिलेदार थेट तुटून पडला, आता बँकही देणार करारा जवाब

Deepak Kesarkar On Rajan Teli Over Nitesh Rane : जिल्हा बँकेत अवैध कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणेच आहेत, असा थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एन्ट्री करताच राजन तेलींनी केला होता. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

Aslam Shanedivan

  1. शिवसेनेत प्रवेश करताच माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री नितेश राणे हे जिल्हा बँकेतील अवैध कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा थेट आरोप केला.

  2. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी तेलींना बँकेची बदनामी टाळण्याचा सल्ला दिला.

  3. या घडामोडींमुळे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज वाटपावरून माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपांमुळे आता वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होताच तेली यांनी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर थेट आरोप केले. अवैध कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणेच आहेत असे त्यांनी म्हटले होते. तसेच याची सखोल चौकशीची मागणी राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केलीय. यावरून आता तेलींवर शिवसेना नेते तथा माजी मंत्री दीपकर केसरकर यांनी थेट हल्लाबोल केला आहे. तसेच खडेबोलही सुनावत बँकेची बदनामी होईल अशी वक्तव्य करू नका असे म्हटलं आहे. याचवेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं देखील तेलींच्या आरोपांना दोन दिवसांत उत्तर दिलं जाईल असे संकेत दिले आहेत. यामुळे आधीच आरोपांत अडकलेले तेली पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राजन तेली यांच्यासह आठ जणांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार झाली आहे. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग झाले आहे. यामुळे याची चौकशी कधीही लागू शकते. या शक्यतेमुळेच तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. अशातच त्यांनी थेट नितेश राणेंवर आरोप करून तळकोकणात वादळ निर्माण केलं आहे.

...या आरोपांशी आपण सहमत नाही

अशावेळी आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी तेली यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, तेली यांनी केलेल्या आरोपांशी आपण सहमत नाही, असे म्हणत एक प्रकारे भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्याबरोबर आपण असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आपल्याच विरोधात दोन वेळा विधानसभा लढलेले तेलींना विरोध असेल असाही इशारा दिला आहे.

केसरकर यांनी, जिल्हा बँकेचे काम हे आदरणीय शिवराम भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली चालले. त्यांचा समर्थपणे वारसा आताचे संचालक मंडळ पुढे नेत आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांना एखाद्या गोष्टींमध्ये कुठे त्रुटी आढळली असेल तर जिल्हा बँकेचे नाव बदनाम होता कामा नये. शेवटी बँकही एक संस्था असून ती लोकांच्या विश्वासावर चालते. बँका या लोकांच्या विश्वासावर चालत असतात आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकांमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे. त्याच्यामुळे आज अशा पद्धतीचे जनरल आरोप करायला गेलो तर बँकेचे नाव बदनाम होतं. याचे थोडासं भान ठेवण्याची गरज असल्याचे म्हणत तेली यांचे कान केसरकर यांनी टोचले आहेत.

तेलींनी केलेले आरोप खोडून काढू

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं देखील तेलींच्या आरोपांना दोन दिवसांत उत्तर दिलं जाईल, असे अध्यक्ष मनीष दळवी यांनी म्हटलं आहे. माजी अध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा बँकेने अवैध पद्धतीने कर्ज वितरण केली आहेत. आर्थिक ऐपत नसलेल्या व्यक्तींना वारेमाप कर्जे दिल्याने बँक दिवाळखोरीत निघण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणारे निवेदन राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले आहे. याकडे दळवी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, तेली यांच्या सर्व प्रश्नांना जिल्हा बँक दोन दिवसांत उत्तर देणार आहे. त्यांनी केलेले आरोप खोडून काढणारे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही जाणूनबुजून तत्काळ उत्तर दिले नाही, असे अध्यक्ष दळवी यांनी सांगितले आहे.

तेलींचे आरोप काय?

दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते. दरम्यान प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा झाला असून त्या कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप तेली यांनी केला. या आरोपामुळे तळकोकणात महायुतीतच खळबळ उडाली असून सगळ काही आलबेल नसल्याचेच दिसत आहे.

तेली यांनी नितेश राणेंनी दबाव टाकून मनमानी पद्धतीने मोठ्या रकमांचे कर्ज वाटप केल्याचा आरोप केलाय. कामगारांना आठ कोटी पर्यंतची कर्जे देण्यात आली, बँक कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना अशीच मोठी कर्जे देण्यात आली. राजकीय सूड काढण्यासाठी आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे भू माफियांची चौकशी व्हायला पाहिजे. 900 कोटी सरकार कारखान्यांना दिले, त्यातील काही कारखाने बंद आहेत, असा आरोपही तेली यांनी केलाय.

शिवाय आपण याची चौकशी व्हावी अशी मागणी गेल्या आठ महिन्यापासून करत आहोत. याबाबत नाबार्ड, सहकार निबंधक, स्थानिक पोलीस यांच्याकडे कर्जवाटपाच्या तक्रारी वारंवार केल्या. मात्र या प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केल्याचेही तेली यांनी म्हटलं आहे.

FAQs :

प्र.1: राजन तेलींनी कोणावर आरोप केले आहेत?
👉 राजन तेलींनी मंत्री नितेश राणे हे जिल्हा बँकेतील अवैध कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे.

प्र.2: दीपक केसरकर यांनी या आरोपावर काय प्रतिक्रिया दिली?
👉 केसरकर यांनी तेलींना बँकेची बदनामी होईल अशी वक्तव्ये टाळण्याचा इशारा दिला.

प्र.3: हा वाद कोणत्या जिल्ह्यातील आहे?
👉 हा वाद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित आहे.

प्र.4: राजन तेली सध्या कोणत्या पक्षात आहेत?
👉 अलीकडेच राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्र.5: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या वक्तव्यांमुळे सिंधुदुर्गमधील भाजप-शिवसेना संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT