Raigad News : कोकणातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तटकरेंनी आपल्याला चार वेळा फसवल्याचा दावा करत, जर जागा मिळाली असती तर शेकापप्रमाणेच राष्ट्रवादीचाही राजकीय अंत केला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया दळवी यांनी दिली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र दळवी यांनी हे वक्तव्य केले. याच वेळी दळवींनी 'व्यक्तीस्वार्थ' आणि 'काही सुपुत्रां'वरही अप्रत्यक्ष टीका करत विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का? असा थेट प्रश्न मंत्री भरत गोगावलेंना विचारला आहे. यानिमित्ताने आता कोकणच्या राजकारणात शिवसेनेती पक्षांतर्गत खदखद बाहेर येताना दिसत आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत नाट्यमय घाडामोडी घडल्या आहेत. एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच कमालीची रस्सी खेच पाहायला मिळाली. शेवटी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली तर उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुत्राला (अनिकेत) मिळाली. यामुळे शिवसेनेत संतापाचा उद्रेक झाला. ज्यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अनिकेत तटकरेंच्या विरोधार उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जुईलीसह सहा जणांनी १२ अर्ज दाखल केले. ते वैधही ठरले.
दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या दिवसाच्या (ता.४) एक दिवस आधी जुईली दळवी यांना पक्षादेश म्हणत अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले. तर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ मानेंसह शेकापचे म्हात्रे आणि इतरांनीही माघार घेतली. ज्यामुळे अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर आता आमदार महेंद्र दळवी यांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपण येथे जनतेच्या जिवावर एकेकाळी कोकणातील रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) निर्विवाद वर्चस्व होते. मात्र त्याला आपण सुरूंग लागला. जिल्ह्यातील स्थानिक संस्थावर असणारे शेकापचे वर्चस्व संपवले.
आपण जेव्हा राजकारण समाज कारणात आलो तेव्हा या जिल्ह्यात शेकाप हा बलाढ्य पक्ष होता. जिल्ह्यातील स्थानिक संस्थावर शेकापचे वर्चस्व होते. त्यांचाही उपदृव प्रचंड वाढला होता. अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. यामुळेच आपण शेकापच्या विरोधात अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो आणि त्या पक्षाचा आपण अंत केला.
याचप्रमाणे आता जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडून त्रास दिला जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून या संधीकडे पाहिले होते. निवडणूक लढली असती तर कदाचित निवडूनही आलो असतो. आणि ज्याप्रमाणे शेकापचा अंत झाला, तसाच राष्ट्रवादीचाही केला असता, असे धक्कादायक विधान दळवी यांनी केलं आहे. तसेच तटकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि युतीतील समन्वयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
याचवेळी दळवींनी गोगावलेंनाही घेरत विधान परिषदेच्या बदल्यात पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का? असा थेट सवाल केला आहे. यामुळे देखील आता शिवसेनेतील खदखद बाहेर येताना दिसत आहे. दळवींनी 'व्यक्तीस्वार्थ' आणि 'काही सुपुत्रां'वरही अप्रत्यक्ष टीका करताना, थेट वाटपामध्ये जागा राष्ट्रवादीला गेली असली तरी गिव्ह अँड टेकमध्ये अशा गोष्टी होत असतात. मात्र त्यामध्ये काही लोकांचा व्यक्तीस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता, असा आरोप दळवी यांनी करत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तर हा आरोप त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चांचा संदर्भ देत केला आहे.
तसेच गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, काही सुपुत्रांना बोलताना राजकीय परिपक्वता असायला हवी, स्वार्थासाठी इमान गहाण ठेवून बोलणे बरोबर नाही, अशा शब्दांत विकास गोगावले यांना झापले होते. तेसच राजकीय मर्यादा आणि सभ्यता जपली पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते. या सर्व घडामोडीनंतर आता कोकणातील महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून शिवसेनेतील खदखद बाहेर येताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.