Aditi Tatkare land scam Sarkarnama
कोकण

Aditi Tatkare land scam : शिंदेच्या शिलेदारानं अजितदादाच्या मंत्र्याविरोधात 'फोडला बाॅम्ब'; तटकरे कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप

Shivsena Mahendra Thorve Alleges NCP Aditi Tatkare Family Illegally Grabbed Government Land in Raigad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.

Pradeep Pendhare

Maharashtra political corruption : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात आघाडी उभारली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या कुटुंबियावर सरकारी जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप आमदार थोरवे यांनी करत खळबळ उडवून दिली आहे. यात आमदार थोरवे यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत असतानाच, सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या आरोपांचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटणार असून, आमदार थोरावे यांच्या आरोपानं विरोधकांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मंत्र्यांविरोधात आयतं कोलीत मिळालं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे कुटुंबांवरती सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा मागितला आहे. रोहा तालुक्यातील दुरटोली गावा जवळील एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले नंतर ती जमीन तटकरे यांनी विकत घेतली, असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. आमदार थोरवे यांनी हा आरोप करताच आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करत खळबळ उडवून दिली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद टोकाला पोचला आहे. महायुतीचे सत्ता स्थापन होऊन, देखील रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीमधील प्रमुख भाजप देखील या तिढ्यावर मार्ग काढू शकलेला नाही.

यातच दिवसेंदिवस महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद वाढताना दिसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही. यानंतर केंद्रातील भाजप नेते अमित शाह सुनील तटकरे यांच्या घरी येऊन गेले. तरी देखील हा वाद तसाच आहे. अमित शाह यांच्या स्वागतासाठी झालेल्या खर्चामुळे हा दौरा चर्चेत आला. सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर विरोधकांनी या खर्चावरून महायुती सरकारमधील राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले.

खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या 'नॅपकिन'ची नक्कल करत डिवचलं होतं. तटकरे यांच्या या नक्कलला मंत्री गोगावले आणि समर्थकांकडून नॅपकिन वाटप करत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आता मंत्रि‍पदासाठी मंत्री गोगावले यांनी आघोरी पुजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राष्ट्रवादीने टायमिंग साधत गोगावले यांना घेरलं आहे. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगड जिल्ह्यात टोकाचा विरोध वाढत असतानाच, शिवसेना आमदार थोरवे यांनी तटकरे कुटुंबाने सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आमदार थोरवे यांनी हा आरोप केल्याने शिवसेनेने ठरवून टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे. आमदार थोरवे यांच्या या आरोपाचे अधिवेशनात काय पडसाद उमटतात, हा मुद्दा एकनाथ शिंदे यांची शिवसेना की, विरोधक लावून धरणार, फक्त हवाच होणार, याची आता उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT