Sindhudurg District Bank; Nilesh Rane And Rajan Teli sarkarnama
कोकण

Nilesh Rane : इशारा देणाऱ्या तेलींना निलेश राणेंनी फटकारलं; सब कुच्छ ठिक है म्हणत दिला मोलाचा सल्ला

Nilesh Rane Vs Rajan Teli Over Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत कर्ज देण्याच्या प्रक्रियेवरून शिंदेंच्या शिवसेनेतील आजी-माजी आमदारच आता आमने-सामने आले आहेत. यावरून येथे जोरदार आरोप-प्रत्यारोप समोर येत आहेत.

Aslam Shanedivan

  1. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कामगिरीचे आणि अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक केले.

  2. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर निलेश राणेंनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले.

  3. या मुद्द्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Sindhudurg News : तळकोकणातील भाजप-शिवसेनेतील वाद नुकताच थंड झाला असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेतील आजी-माजी आमदारच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत कर्ज देण्याच्या प्रक्रियेवरून आमने-सामने आले आहेत. यामुळे येथील राजकीय वातावरण तापले असून बँकेतील कर्ज देण्याच्या प्रक्रियेत गडबड असल्याचा मोठा आरोपच माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. तसेच त्यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना देखील खडे बोल सुनावत ते हवेत असतात असे म्हटले आहे. यानंतर आता या प्रकरणात आमदार निलेश राणे यांनी उडी घेतली असून त्यांनी तेलींना फटकारले आहे. तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी नुकसान करू नये, चर्चेतून मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तेली यांनी बँकेतील कर्ज वितरण चुकीच्या मार्गाने होत असल्याचा दावा केला होता. तसेच या प्रक्रियेमुळे सहकारी संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच याप्रकरणी जिल्हाबँकेचे अध्यक्ष व नितेश राणेंचे निकटवर्तीय असलेल्या मनीष दळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले होते. तर दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे दबंगशाही राबवत असल्याचा आरोप केला होता. तर या प्रकरणी आपण दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले होते. तर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांही भेटू. त्यानंतरही कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असाही इशारा दिला होता.

आता या प्रकरणात आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या काही वर्षांत राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे कार्यही कौतुकास्पद असून जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकरी मच्छिमार सर्वसामान्य नागरिकांची आहे. यावर जिल्ह्यातील सहकारी संस्था पतसंस्था व शेतकरी अवलंबून असून ही बँक राज्यात व देशात सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी नुकसान करू नये, चर्चेतून मार्ग निघू शकतो असे म्हणत तेलींना चांगलेच फटकारले आहे.

तसेच त्यांनी, आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही असेही निलेश राणे म्हणालेत. दरम्यान भाजपवर तुटून पडणाऱ्या निलेश राणेंनीच आता जिल्हा बँकेवर पोस्ट करून सगळी ठिक चालल्याचे म्हटल्याने राजन तेलींची मात्र चांगलीच गोची झाली आहे. निलेश राणेंच्या या पोस्टची जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अशातच राजन तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची देखील भेट घेतल्याचे समोर आले आहे. या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली असून यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी माझ्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये, नाईक यांच्याशी झालेली भेट राजकीय नसून वैयक्तिक होती. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम असून या सर्व प्रकरणावर आणि आपल्या भूमिकेबद्दल आमदार निलेश राणेंशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग बँकेचे हित जपणे हे आमचे देखील काम आहे. बँकेच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

FAQs :

1. निलेश राणेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
➡️ त्यांनी जिल्हा बँकेच्या कामगिरीचे कौतुक करत मनीष दळवी यांचे नेतृत्व उल्लेखनीय असल्याचे म्हटले आहे.

2. राजन तेलींनी कोणते आरोप केले होते?
➡️ त्यांनी मनीष दळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती.

3. या प्रकरणात दीपक केसरकर यांचा उल्लेख का झाला?
➡️ राजन तेलींनी स्वपक्षातील नेते माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली होती.

4. हा वाद कुठे व्यक्त झाला?
➡️ निलेश राणेंनी आपली भूमिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मांडली आहे.

5. या वादाचा पुढील राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT