Khalapur News : राज्यात महायुतीच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी राजकीय वर्चस्वाच्या मुद्द्याऐवजी एल अँड टी (L&T) कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. खालापूर तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाल्याने रायगडच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे घटक पक्ष एकत्र आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात स्थानिक प्रश्नांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील मतभेद वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेतील एकजुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे.
थोरवे-घारे यांच्यातही खटके?
रायगडच्या राजकारणात मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा चर्चेत राहिला आहे. आता आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यातील मतभेदही समोर येत असल्याचे चित्र आहे. या राजकीय संघर्षाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटत आहेत. कर्जत आणि खालापूर परिसरात विविध प्रश्नांवरून दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
L&T प्रकल्प आणि स्थानिक रोजगारावरून वाद
खालापूर तहसीलदार कार्यालयात एल अँड टी (L&T) कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासह स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्याचे रूपांतर शाब्दिक वादात झाले. या वादावर तोडगा काढण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पुढाकार घेत बैठक आयोजित केली होती.
मात्र, प्रश्नावर तोडगा निघण्याआधीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आणि महसूल प्रशासनाने हस्तक्षेप केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि बैठकीतील वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान स्थानिक रोजगाराचा प्रश्न हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असल्याने L&T प्रकल्पाबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेला हा संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीत राज्यात एकत्र, रायगडात संघर्ष
राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मात्र मतभेद निर्माण होत असल्याचे रायगडमधील या घटनेतून दिसून येते. कर्जत आणि खालापूर परिसरात प्रकल्प, स्थानिक रोजगार आणि राजकीय प्रभाव या मुद्द्यांवरून सुरू असलेला संघर्ष महायुतीसमोरील स्थानिक आव्हाने अधोरेखित करतो. L&T प्रकल्प आणि स्थानिक रोजगाराचा प्रश्न चर्चेत असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे रायगडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.