संदेश पारकर यांनी १७ वर्षांनंतर कणकवली नगराध्यक्षपद जिंकत मोठा राजकीय विजय मिळवला.
विजय मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट न घेता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai News : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून चांदा ते बांदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात वाताहत झाली आहे. येथे कसेबसे त्यांचे नगरसेवक निवडून आले आहे. एकमेव असणारा नगराध्यक्षही शिंदेंनी पळवल्याचे समोर आले होते. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असाणारे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. त्यांनी येथे पालकमंत्री नितेश राणेंनाच होमपिचवर पाणी पाजले आहे. ज्यात त्यांची मदत आमदार निलेश राणे यांनी केली. त्यामुळे संदेश पारकर हे राज्याच्या पटलावर गेले. पण आता तेच शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे दिसत असून ठाकरेंचा दुसराही नगराध्यक्ष फुटला? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल येत असतानाच दुपारपर्यंत भाजपने शंभरी ओलांडली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अर्धशतक पार केले होते. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही ४० ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले होते. या तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी विधानसभेसारखीच निष्प्रभ ठरली. ठाकरे सेनेचे केवळ ८ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अशातच रायगडमधील श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अतुल चौगुले हे दणदणीत मतांनी विजयी झाल्याचे समोर आले. यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.
मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पडद्याआडून मदत केल्याचे उघड झाले आणि अतुल चौगुले यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. गोगावले यांनी ही आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी विजयी नगराध्यक्षाची मानसिकता असून वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य केल्याने यात भर पडली होती.
दरम्यान या चर्चा थांबतात न थांबतात तोच आता तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा कणकवलीचे नगराध्यक्ष पदावर बाजी मारलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा बातम्या येवून थडकल्या आहेत. यामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नुकताच नगराध्यक्ष झालेले पारकर यांनी मुंबईत गाठली आहे. पण त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती होती. या भेटीनंतर आता पारकर हे शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिव धनुष्य हाती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय. तर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आता खळबळ उडाली आहे.
पारकर यांनी कणकवली शहर विकास आघाडी करून त्याचे नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्याकडे दिले होते. त्यांच्या मदतीने त्यांनी भाजपला येथे सत्ता काबीज करण्यापासून रोखले. यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री नीतेश राणेंना त्यांच्याच होमपीचवर धक्का देण्यासह आव्हान निर्माण केल्याचे बोलले जात आहे. पण कणकवलीत शेवटच्या क्षणापर्यंत आमदार नीलेश राणे यांनी महायुतीसाठी आग्रही होते. मात्र भाजपने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतरच ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी डाव टाकत कणकवली शहर विकास आघाडी बनवली आणि त्याचे नेतृत्व त्यांनी कोणताही न जूमाणता नीलेश राणे यांच्यांकडे दिले.
नंतर या आघाडीची गल्ली ते दिल्ली चर्चा झाल्याने उद्धव ठाकरेंनी मुंबईत मातोश्रीवर बैठक घेवून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली होती. तसेच गद्दारांशी युती नाहीच अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतरही संदेश पारकर यांनी आपली ठाम भूमिका घेत आघाडी केली. आणि थेट पालकमंत्री नीतेश राणेंच्या नेतृत्वातील भाजपला आव्हान दिले. आणि ते नगराध्यक्ष म्हणून निवडूनही आले.
1. संदेश पारकर कोण आहेत?
ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आहेत.
2. त्यांनी किती वर्षांनंतर नगराध्यक्षपद जिंकले?
तब्बल १७ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा नगराध्यक्षपद मिळवले.
3. पारकरांनी कोणाची भेट घेतली आहे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मुंबईत भेट घेतली.
4. या भेटीत कोण उपस्थित होते?
उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
5. या भेटीचा राजकीय अर्थ काय काढला जात आहे?
ठाकरेंच्या शिवसेनेतील महत्वाचा नेता शिंदे गटाच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.