

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात गटबाजी उफाळून आली आहे.
जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यातील वादामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही दोन गटांत वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जात असून पक्षातील फूट उघड झाली आहे.
Solapur, 23 December : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही पक्षातील गटबाजी संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. महापालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती आज पक्षाकडून घेण्यात येत आहेत. मात्र, मुलाखतींच्या प्रक्रियेमध्येही गटबाजी दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात (Shivsena UBT) सोलापूर लोकसभेचे प्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यातील वादाने गेल्या काही दिवसांपासून गंभीर रूप घेतले आहे. दोघांकडूनही जाहीररित्या एकमेकांच्यावर चिखलफेक केली जात आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत पुरुषोत्तम बरडे यांना पाहिल्यानंतर अजय दासरी हे निघून गेले होते.
अजय दासरी यांच्या वागण्यामुळे आपल्याला सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीच्या मुख्य समन्वयकपदातून मुक्त करावे, अशी मागणी बरडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच, दासरी यांनीही सोलापूरचे प्रभारी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आपण आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, त्यामुळे सोलापूर महापालिका निवडणुका लढायला निघालेल्या शिवसेनेतील बेकी कायम चव्हाट्यावर येत आहे.
दरम्यान, सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्यातही गटबाजी दिसून येत आहे. अजय दासरी हे स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, तर मुख्य समन्वयक बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख संतोष पाटील हे दुसरीकडे मुलाखती घेत आहेत, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी उफाळली आहे.
जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याकडे सोलापूर उत्तर आणि सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आपल्या शहर कार्यालयात घेत आहेत. त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रेय गणेशकर उपस्थित होते.
दुसरे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्याकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, त्यामुळे पाटील, पुरुषोत्तम बरडे आणि अस्मिता गायकवाड हे जुळे सोलापुरात मुलाखती घेत आहेत.
बेबनाव वाढला
महापालिका निवडणुकीत पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन निवडणुका जिंकणं अपेक्षित असताना ठाकरेंच्या सेनेतील बेबनाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्व नेत्यांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र, इथं दररोज एकमेकांना इशारे दिले जात आहेत. एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत, त्यामुळे गटबाजीने पोरखलेली ठाकरेंची शिवसेना बलाढ्य महायुती कसा सामना करणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.
प्र.1: सोलापूर शिवसेनेतील प्रमुख वाद कोणामध्ये आहे?
उ: जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यात वाद आहे.
प्र.2: या वादाचा निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम झाला आहे?
उ: इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दोन वेगवेगळ्या गटांत घेतल्या जात आहेत.
प्र.3: अजय दासरी कोणत्या मतदारसंघांची जबाबदारी सांभाळत आहेत?
उ: सोलापूर उत्तर आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
प्र.4: दुसऱ्या गटात मुलाखती कोण घेत आहेत?
उ: पुरुषोत्तम बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख संतोष पाटील मुलाखती घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.