Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; कोकणात मानहानीकारक पराभव

Uddhav Thackeray's Shiv Sena suffers humiliating defeat in Konkan: एकेकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे हृदय होते. गेल्या विधानसभेतही या दोन्ही जिल्ह्यांनी त्यांना भरभरून साथ दिली होती. शिवसेना फुटली तरी या दोन जिल्ह्यांत आपली मते विभागली जाणार नाहीत, या ठाकरे पक्षाच्या भ्रमाचा भोपळा लोकसभेवेळीच फुटला होता, मात्र...

Deepak Kulkarni

शिवप्रसाद देसाई

Ratnagiri -Sindhudurg News : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेने भाजपच्या साथीने भगव्या लाटेवर स्वार होत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा मोठा पराभव केला. नियोजनबद्ध आणि एकसंघ राहून महायुतीने केलेला प्रचार त्यांच्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरला. कोकणातील मते भावनिक मुद्द्यावर आपल्या सोबतच राहतील, हे गृहीत धरणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंगाशी आले. त्यांचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त झाला आहे.

एकेकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे हृदय होते. गेल्या विधानसभेतही या दोन्ही जिल्ह्यांनी त्यांना भरभरून साथ दिली होती. शिवसेना (Shivsena) फुटली तरी या दोन जिल्ह्यांत आपली मते विभागली जाणार नाहीत, या ठाकरे पक्षाच्या भ्रमाचा भोपळा लोकसभेवेळीच फुटला होता, मात्र विधानसभेतही त्यांना सावरता आलेले नाही.

दोन्ही जिल्ह्यांतील आठपैकी अवघ्या एका जागेवर ते विजय राखू शकले. रत्नागिरी- सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघांपैकी तीन विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी झाली. यात शिवसेनेला पाच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक मिळून महायुतीला तब्बल सात जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला गुहागरच्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

दापोलीत शिवसेनेच्या योगेश कदम यांनी ठाकरे पक्षाच्या संजय कदम यांचा मोठा पराभव केला. भाजपशी मनोमिलन झाल्याचा योगेश यांना फायदा झाला. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम थोड्या फरकाने निवडून आले. संगमेश्‍वर तालुक्याने दिलेली साथ आणि एक गठ्ठा मुस्लिम मते महाविकासकडे जाण्यापासून रोखण्यात त्यांना यश आले. रत्नागिरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांनी एकतर्फी विजय मिळवला.

ऐनवेळी भाजपच्या बाळ माने यांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयोग अयशस्वी ठरला. राजापूरात विद्यमान आमदार असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला.

रत्नागिरीत गुहागरची एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली. तेथे भास्कर जाधव यांचा वैयक्तिक करिष्मा आणि मतदारसंघावरील पकड त्यांच्यासाठी फायद्याची ठरली. सिंधुदुर्गात कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे आणि सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

कुडाळमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या वैभव नाईक आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होती. भाजपची साथ, राणे फॅक्टर या बळावर निलेश राणे ‘धनुष्यबाणा’च्या चिन्हावर आमदार झाले. कोकणात आता ठाकरेंच्या शिवसेनेला संघटना टिकविण्याचे आव्हान असेल.

पक्षीय बलाबल

2019

भाजप-1

शिवसेना-6

राष्ट्रवादी काँग्रेस-1

2024

शिवसेना-5

भाजप-1,

राष्ट्रवादी (अजित पवार)-1

शिवसेना (उद्धव ठाकरे)-1

ठळक मुद्दे

* लाडकी बहीण, हिंदुत्वाचा मुद्दा महायुतीला पोषक

* कमळ चिन्हावर एकच जागा मिळूनही भाजपची शिंदे शिवसेनेला साथ

* महाविकास आघाडीत संघ भावनेचा अभाव

* ठाकरेंच्या शिवसेनेतून अंतर्गत धुसफूसही ठरली तोट्याची

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT