Raigad News : श्रीवर्धन तालुका भाजपचे अध्यक्ष आणि माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई महापालिकेत (बीएमसी) नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी त्यांना दिवेआगर येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांनी मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाटील यांच्याविरोधात मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९४/२०२४ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार तेजस राजेश बारगडे, आकाश बारे आणि रोहित बारे यांच्याकडून प्रत्येकी दीड लाख रुपये, अशी एकूण साडेचार लाख रुपयांची रक्कम पाटील यांनी घेतल्याचा आरोप आहे.
तसेच अन्य तीन जणांकडूनही नोकरीचे आमिष दाखवून साडेचार लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. पैसे घेऊनही नोकरी मिळाली नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस तपासात सहा जणांची एकूण नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आशुतोष पाटील यांनी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी हा अर्ज फेटाळला. त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी दिवेआगर येथून पाटील यांना ताब्यात घेतले.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीवर्धनमधील राजकीय वर्तुळात, विशेषतः भाजपच्या गोटात, खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.