Political Crime News : राजकारणात खळबळ! काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक

Thane Crime News : काँग्रेस शहराध्यक्षांवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला असून रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकाराने राजकारणात खळबळ उडाली असून ही घटना अंबरनाथमधील पालेगाव येथे घडली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये गुंडगिरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष यासीन अकबर शेख यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सज्जन पाटील उर्फ बाबू याला अटक केली आहे. या घटनेमुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गाडी पार्क करण्यावरून वाद; तलवार घेऊन धावल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमधील पालेगाव परिसरातील ‘महाराज चहा’ या दुकानाबाहेर यासीन शेख हे आपल्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी आले होते. त्यांनी आपली गाडी दुकानाबाहेर उभी केली होती. त्याचवेळी सज्जन पाटील उर्फ बाबू हा देखील तेथे आला. गाडी पार्क करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

या वादानंतर बाबू पाटील याने आपल्या गाडीतून तलवार काढून यासीन शेख यांच्या दिशेने धाव घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने शिवीगाळ करत रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

Congress
Political Crime News : शिंदे गटातील आमदाराच्या 'पीए'सह चौघांना पोलीस कोठडी; काय आहे प्रकरण ?

पोलिस घटनास्थळी दाखल; आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच आरोपी वाहनासह तेथून निघून गेला होता. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात वादाचा प्रकार कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यासीन शेख यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून सज्जन पाटील उर्फ बाबू याला अटक केली आहे. या घटनेनंतर यासीन शेख यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती आहे.

वक्तव्यामुळे राजकीय वादाची शक्यता

या घटनेदरम्यान आरोपीने भाजपच्या वॉर्डाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘पालेगावात आम्हीच बॉस आहोत. काँग्रेसवाल्यांनी भाजपच्या वॉर्डात येऊ नये,’ असे म्हणत त्याने धमकावल्याचा आरोप आहे.

Congress
Political Crime News : मोठी बातमी ! शिंदे गटाचा आमदार गोत्यात? ननावरे दाम्पत्य मृत्यूप्रकरणी आमदाराच्या 'पीए'सह चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

या कथित वक्तव्यामुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असताना, या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com