कोकण

Shinde Group Politics : पदाधिकारी नियुक्त्या रद्दप्रकरणी सिद्धेश कदमांचा मोठा खुलासा; 'ते' चाळीस पदाधिकारी घेणार वेगळी भूमिका ?

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : शिवसेना शिंदे गटाच्या विभाग क्र. दोनमधील पदाधिकारी नियुक्त्यांवरून वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. पण ती रद्द करण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेतील 40 नाराज पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यावर आता स्वत: सिद्धेश रामदास कदम यांनीच खुलासा केला आहे.

सिद्धेश रामदास कदम यांनी एक पत्र काढून शिवसेना विभाग क्रमांक दोनमध्ये कोणत्याही नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. जे पदाधिकारी प्रभारी आहेत आणि सध्या कार्यरत आहेत. तेच पदाधिकारी नवीन पद नियुक्ती होईपर्यंत कार्यरत राहतील. अशी माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या मालाड, चारकोप आणि कांदिवली पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्याविषयी नाराजी आहे. या संदर्भात चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची घोषणा केली होती. यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच, सिद्धेश कदम यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी देखील केली.

मुख्यमंत्र्याच्या या भेटीनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी सिद्धेश कदम यांनी केलेल्या नेमणुका एकनाथ शिंदेंनी रद्द केल्याची माहिती दिली होती. (Kokan News) मात्र आता सिद्धेश कदम यांनी पत्रक काढून त्या नाराज पदाधिकाऱ्यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजूत काढलेले ते 40 नाराज पदाधिकारी आता नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT