Sindhudurg News : दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तळकोकणातील चिपी विमानतळावरून पुन्हा विमानसेवा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग ते मुंबईदरम्यान नियमित विमानसेवा सुरू झाल्याने कोकणवासीयांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारी ही सेवा सोमवार (१६ नोव्हेंबर) पासून सुरू झाली आहे. फ्लाय ९१ कंपनीच्या विमानाने चिपी विमानतळावर आगमन केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्याच विमानातून प्रवास केला. दरम्यान, हे विमानतळ आता कायमस्वरूपी सुरू राहील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भविष्यात शिर्डी आणि अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
दोन वर्षांनंतर चिपी विमानतळावर विमानाचे आगमन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा सोमवारपासून सुरू झाली. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर फ्लाय ९१ कंपनीचे विमान चिपी विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर विमानाचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात पहिल्या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्गदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या रस्ते किंवा रेल्वेने मुंबई गाठण्यासाठी लागणारा बराच वेळ वाचणार असून, विमानाने हा प्रवास अवघ्या एका तासात करता येणार आहे.
शिर्डी, अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू होणार?
चिपी विमानतळावरील विमानसेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक परवानग्या घेण्यात आल्या असून विमानतळ नियमित सुरू राहील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. या विमानसेवेमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, सध्या चिपी ते नवी मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, इंडिगोची विमानसेवा अद्याप सुरू व्हायची आहे. त्याचबरोबर शिर्डी आणि अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या नव्या सेवांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराची अनेक साधने आणि संधी उपलब्ध होतील. जिल्ह्याच्या विकासासाठी राणे साहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चिपी विमानतळावरील विमानसेवा सुरू झाल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः गोवा आणि कोकण पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सिंधुदुर्गपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. विमानसेवेमुळे पर्यटनाबरोबरच स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि रोजगारनिर्मितीलाही फायदा होऊ शकतो. मात्र, ही सेवा केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
विमानात मालवणी भाषेत फराटेदार गाऱ्हाणे! चिपी विमानतळावरील विमानसेवेच्या शुभारंभाला मालवणी संस्कृतीची खास झलकही पाहायला मिळाली. मुंबईहून चिपीच्या दिशेने विमानाने उड्डाण करताच विमानात मालवणी भाषेत देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी आपल्या खास मालवणी शैलीत हे गाऱ्हाणे घातले.
ही विमानसेवा अखंडितपणे सुरू राहावी, विमानाने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना उत्तम आरोग्य लाभावे आणि सर्वांचा प्रवास सुखरूप व्हावा, असे साकडे यावेळी देवाला घालण्यात आले. प्रमोद धुरी यांच्या या खास मालवणी गाऱ्हाण्याला पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनीही दाद दिली.
एकूणच, दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिपी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने सिंधुदुर्गवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता ही सेवा नियमित सुरू राहण्याबरोबरच शिर्डी, अहमदाबाद आणि अन्य शहरांसाठीही विमानसेवा सुरू होणार का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.