

Mumbai sea hoardings issue : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर विविध मुद्द्यांवर टीका केली जाते. या राजकीय टीकेला ठाकरेंकडूनही प्रत्युत्तर दिले जाते. मात्र, आता थेट राणेंच्या मंत्रालयाशी संबंधित एक मुद्दा ठाकरेंच्या हाती लागला आहे. राणेंच्या मंत्रालयातून घेण्यात आलेल्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला असून ठाकरेंसह विविध संघटनाही मैदानात उतरल्या आहेत.
मुंबईच्या समुद्रात तरंगते जाहिरात फलक उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध सुरु झाला आहे. मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप होण्याबरोबरच समुद्री पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत राजकीय नेत्यांसोबतच पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमार संघटनांकडून हा प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे. सरकारने या निर्णयाला स्थगिती न दिल्या या विषयावर संघर्ष उभारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मंत्री राणे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक भागांतून समुद्राचे दर्शनही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत समुद्रातही मोठ्या जाहिराती उभारल्यास नागरिकांना निसर्गाऐवजी जाहिरातीच पाहाव्या लागतील.
कंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याला प्राधान्य द्यावे. या निर्णयात तातडीने हस्तक्षेप करून तो थांबवावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवाय या फलकांसाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडी दिव्यांमुळे समुद्री जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रकल्प राबवण्यापूर्वी पर्यावरणीय परिणामांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमार संघटनांकडून होत आहे.
नितेश राणेंकडून खुलासा
नितेश राणे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने (MMB) काढलेल्या होर्डिंगच्या निविदेबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. प्रस्तावित चार फ्लोटिंग होर्डिंगपैकी दोन होर्डिंग सी लिंकजवळ अस्तित्वात असून केवळ दोन नवीन होर्डिंग उभारण्याचे प्रस्तावित आहे.
समुद्रात २० होर्डिंग उभारण्यात येणार असल्याची माहिती दिशाभूल करणारी आहे. मुंबईच्या सागरी पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही उपक्रमाला मी कधीही पाठिंबा देणार नाही. या मुद्द्याला विनाकारण राजकीय रंग दिला जात आहे. या स्पष्टीकरणामुळे वस्तुस्थिती समोर येईल, अशी आशा असल्याचेही राणेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.