Narayan Rane- Nitesh Rane
Narayan Rane- Nitesh Rane Sarkarnama
कोकण

जिल्हा बॅंकेपेक्षा या निकालाकडे राज्याचे लक्ष; कारण राणे पिता-पुत्रांनी जिवाचे रान केले होते..

सरकारनामा ब्यूरो


ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची (Sindhudurg Bank Election) निवडणूक राज्यात गाजली. या निवडणुकीतील सामना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) विरुद्ध महाविकास यांच्यात झाला. आता तशीच चुरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत झाली. नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या निवडणुकीत जिवाचे रान केले होते. त्यामुळे या निकालाचीही जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे.

जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दुसरा टप्पा आज संपला. तेथील उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. दुसऱ्या टप्प्यात एकूण सात हजार ६३ पैकी पाच हजार २९९ मतदारांनी हक्क बजावल्याने सरासरी ७५.०२ टक्के मतदान झाले. उद्या (ता.१९) मतमोजणी होणार असून सत्ताधीश कोण, हे ठरणार आहे. चारही नगरपंचायतसाठी एकूण २११ उमेदवारांचे बंद झालेले राजकीय भवितव्य मतपेटीतून खुले होणार आहे.

राज्यातील १०५ नगरपंचायतसह जिल्ह्यातील या चार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन २१ डिसेंबरला मतदान झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले प्रभाग वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे चारही नगरपंचायतीमधील ओबीसी आरक्षित असलेले प्रत्येकी चार प्रभाग वगळून उर्वरित १३ प्रभागांसाठी मतदान झाले. त्यानंतर निवडणूक विभागाने हे ओबीसी आरक्षित प्रभाग अनआरक्षित करीत पुन्हा सोडत काढली. त्यासाठी आज मतदान झाले.
कुडाळमध्ये १७ जागा असून यासाठी १२ हजार ४४० मतदार होते. उर्वरित तिन्ही नगरपंचायतसाठी १७ जागा असून वाभवे-वैभववाडीसाठी १७७६ मतदार, कसई-दोडामार्गसाठी २७५३ मतदार तर देवगड-जामसांडेसाठी ११ हजार ५९६ मतदार होते. यातील २१ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावेळी कुडाळ नगरपंचायतसाठी सहा हजार ५३८ ( ७१.६२ टक्के) मतदारांनी मतदान केले होते. वाभवे-वैभववाडीसाठी ११३३ (८१.८६ टक्के) मतदान झाले होते. कसई-दोडामार्गसाठी १७६१ (८१.८७) टक्के मतदान झाले होते. देवगड-जामसंडेसाठी सहा हजार २३८ (७०.९२) टक्के मतदान झाले होते. एकूण १५ हजार ७०० मतदान (७३.०२) टक्के मतदान झाले होते.

आज कुडाळ तीन हजार २६९ पैकी २४०७ (७३.६३ टक्के), वाभवे-वैभववाडी ३९२ पैकी ३२४ (८२.६५ टक्के), कसई-दोडामार्ग ६०२ पैकी ४८३ (८०.२३ टक्के) तर देवगड-जामसांडेसाठी १८०० पैकी दोन हजार ८५ (७४.४६ टक्के) मतदान झाले.

वैभववाडी-दोडामार्गमध्ये चुरशीने मतदान
चारही नगरपंचायतसाठी दोन्ही टप्प्यात झालेले मतदान पाहता वैभववाडी व दोडामार्गमध्ये चुरशीने मतदान झाले. सकाळी साडेसातला प्रक्रिया सुरू झाली. एकूण १६ केंद्रे होती. कुडाळ ९, वैभववाडी १०, दोडामार्ग ११ तर देवगडमध्ये १७ उमेदवार रिंगणात होते. दोन्ही टप्प्यांचा विचार केल्यास वैभववाडीत सर्वाधिक ५६, दोडामार्ग ५३, देवगड ५२ तर सर्वात कमी कुडाळ ५० उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
---------------
निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट
देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात आहे. कुडाळची मोजणी कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे आहे. सकाळी दहा ते साडेदहा वाजता मोजणी सुरू होईल. अवघ्या दीड-दोन तासात कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत या नगरपंचायतींचे नवे सत्ताधीश कोण, हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT