Zilla Parishad elections Politics sarkarnama
कोकण

Kokan Politics : तळकोकणाचे राजकारण तापले? भाजप, शिवसेनेला बंडखोरीची भीती

Zilla Parishad elections Politics : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणार असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. पण आता त्याच्याआधीच येथे अध्यक्षपद मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे.

Aslam Shanedivan

  1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सातव्या टर्ममध्ये ३३ वे अध्यक्षपद मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

  2. शिवसेना-भाजप युती निश्चित झाली असून महाविकास आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

  3. खुले अध्यक्षपद आणि बदललेली राजकीय गणिते यामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.

Sindhudurg News : विनोद दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सातव्या टर्ममध्ये येणारे ३३ वे अध्यक्षपद मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. खुले झालेले पद आणि बदललेली राजकीय गणिते यामुळे ही चुरस वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यापासून स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर १९ एप्रिल १९९२ ला पहिले लोकनियुक्त प्रशासन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर विराजमान झाले. पहिले अध्यक्ष होण्याचा मान कणकवली येथील य. बा. दळवी यांनी मिळविला.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात लोकनियुक्त प्रशासनासाठी एकूण सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. शेवटची सहाव्या कार्यकारिणीची मुदत २० मार्च २०२२ ला संपली होती. ५ फेब्रुवारीला होणारी सातवी निवडणूक आहे. आता शिवसेना आणि भाजप यांची युती निश्चित झाली आहे. विरोधकांची महाविकास आघाडी एकत्र मोट बांधून लढणार, की स्वतंत्र?, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. अर्थात या लढतीत सगळ्यात महत्त्वाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठीची चुरस राजकीय पक्ष आणि मातब्बर नेत्यांमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ प्रशासकीय राजवट होती. एप्रिल १९९२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. यात काँग्रेसच्या पॅनेलने बाजी मारली. त्यामुळे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बसले. हा बहुमान कणकवली तालुक्यातील य. बा. दळवी यांनी मिळविला. यानंतर आतापर्यंत एकूण ३२ अध्यक्ष विराजमान झाले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर ३३ वा अध्यक्ष बसणार आहे. पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मधुमती मधुकर बागकर यांनी मिळविला आहे. आतापर्यंत बारा महिला अध्यक्ष झाल्या आहेत. यातील संजना सावंत यांनी दोन वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळविला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३६ वर्षे कारभारातील २५ वर्षे सत्ता खासदार नारायण राणे यांच्या हातात राहिली आहे. अलीकडची चार वर्षे प्रशासक राजवट राहिली आहे. लोकनियुक्त सत्तेचा विचार केल्यास १९९२ ते १९९७ ही पहिली पाच वर्षे वगळता उर्वरित कालावधी राणेंचे वर्चस्व राहिले आहे. १९९७ च्या सार्वात्रिक निवडणुकीत नारायण राणेंनी कार्यरत असलेल्या शिवसेना या पक्षाची सत्ता आणली होती. अर्थात त्यावेळी शिवसेना-भाजप युती होती. शिवसेनेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान राजन तेली यांना मिळाला होता. त्यानंतर पुन्हा २००२ च्या सर्वात्रिक निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आली. याच दरम्यान अशोक सावंत अध्यक्ष असताना २००५-२००६ मध्ये राणेंनी शिवसेना सोडत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संजना सावंत अध्यक्ष असताना राणेंनी काँग्रेस सोडली. २०१९ मध्ये ही राजकीय उलथापालथ झाली. यावेळी राणेंनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्ष स्थापन केला होता. डिसेंबर २०१९ मध्ये राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दीड वर्षे भाजपची सत्ता जिल्हा परिषदेवर राहिली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिग्गज इच्छुक आधीपासूनच याकडे डोळे लावून आहेत. यातच शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये युती झाली आहे.

सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच पक्षांकडे आहे. युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. अध्यक्षपदाकडे डोळे असलेल्या काही इच्छुकांचा या जागा वाटपामुळे हिरमोड झाला, तर काहींच्या आशा पल्लवीत झाली आहे. कारण, या दोन मोठ्या पक्षांमध्ये जागा वाटपात काही इच्छुकांचे मतदारसंघ मित्रपक्षाकडे गेले आहेत. काही दिग्गजांचे बालेकिल्ले त्यांच्या पक्षाकडे कायम राहिले आहेत. महाविकास आघाडी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. विशेषतः ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार की काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सोबत घेऊन युतीशी दोन हात करणार, याबाबत अस्पष्टता आहे.

काँग्रेसची सर्वाधिक सत्ता

जिल्हा परिषदेवर पहिले लोकनियुक्त प्रशासन १९ मार्च १९९२ मध्ये विराजमान झाले. राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्याच निवडणुकीत बाजी मारत सत्ता स्थापन केली. यानंतर १९९७ च्या सर्वात्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजपने सत्ता मिळविली. २००२ च्या निवडणुकीतही शिवसेना-भाजपने पुन्हा बाजी मारली; मात्र २००५ मध्ये सत्तापालट झाला. शिवसेनेच्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आठ वर्षांनंतर काँग्रेसची जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता आली. २००७ व २०१२ मध्ये पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आली.

२०१७ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ही कार्यकारिणी कार्यरत असताना २०१९ मध्ये नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्याने जिल्हा परिषदेवरील काँग्रेसची सत्ता गेली. काही महिने ही सत्ता राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडे होती. डिसेंबर २०१९ मध्ये राणे भाजपमध्ये गेल्याने जिल्हा परिषद सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. जिल्हा परिषदेवर सर्वाधिक २० वर्षे कालावधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची, तर ८ वर्षे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मधले काही महिने राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ताब्यात सत्ता होती. डिसेंबर २०१९ पासून जिल्हा परिषदेची सव्वादोन वर्षे भाजपच्या ताब्यात राहिली. पहिले लोकनियुक्त शासन येण्यापूर्वी व मार्च २०२२ पासून प्रशासक राजवट लागू झाल्यापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासनाने पाहिला आहे.

दोनच पदाधिकारी होऊ शकले आमदार

जिल्हा परिषद लोकनियुक्त प्रशासन येऊन ३० वर्षे होत आली. यातील अध्यक्ष झालेले राजन तेली व विषय समिती सभापती झालेले परशुराम उपरकर हे दोनच पदाधिकारी आमदार झाले; मात्र हे दोन्ही थेट आमदार होत विधान परिषदेत गेले होते, विधानसभेचा आमदार किंवा लोकसभा किंवा राज्यसभा खासदार झालेले नाहीत.

भाजप, शिवसेनेला बंडखोरीची भीती

डिसेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एका नगर पंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. यावेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती. यावेळी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या पक्षावर, नेत्यांवर आरोप झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात या दोन्ही पक्षात क्लेश निर्माण होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी असताना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती केली आहे. मात्र, यावेळी दोन्ही पक्षात बंडखोरी होण्याची भीती आहे. तसेच एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी कुरापती केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणूक युद्धात बाजी मारताना सर्वच उमेदवारांची दमछाक होणार आहे.

FAQs :

1) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सातवी निवडणूक कधी आहे?
५ फेब्रुवारी रोजी सातव्या टर्मसाठी निवडणूक होणार आहे.

2) आतापर्यंत किती लोकनियुक्त निवडणुका झाल्या आहेत?
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी आतापर्यंत सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत.

3) पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होता?
कणकवली येथील य. बा. दळवी हे सिंधुदुर्गचे पहिले अध्यक्ष होते.

4) सध्या कोणती युती निश्चित झाली आहे?
शिवसेना आणि भाजप यांची युती निश्चित झाली आहे.

5) अध्यक्षपदाची लढत का चुरशीची ठरणार आहे?
अध्यक्षपद खुले असून राजकीय समीकरणे बदलल्याने सर्व पक्ष आणि मातब्बर नेते सक्रिय झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT