Aditya Thackeray-Eknath Shinde
Aditya Thackeray-Eknath Shinde Sarkarnama
कोकण

शिवसेनेचे सहा नेते फोडून शिंदे गटाने केले आदित्य ठाकरेंचे रत्नागिरीत स्वागत; सभा सुरू असतानाच दिला दणका!

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेला जोरदार झटका दिला. ठाकरेंची सभा सुरू असतानाच शिवसेनेच्या अनेक निष्ठावंतांनी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाने तसा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, नावडी विभागप्रमुख महेश देसाई, रत्नागिरी तालुका संपर्कप्रमुख मंगेश साळवी, माजी जिल्हा परिषद सभापती सहदेव बेटकर आणि जयगड विभागप्रमुख अनिकेत सुर्वे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Six leaders of Shiv Sena join Eknath Shinde group)

शिवसेनेत गटबाजी उफाळून आल्यानंतर ४० आमदारांनी बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला. शिवसेनेच्या आमदारांचे विभाजन झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेला हे जिव्हारी लागले असून, बंड करणाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. तसेच, शिंदे गटामध्ये दिसणाऱ्यांची हाकलपट्टी केली जात आहे. या प्रकारामुळे शिवसेना अडचणीत आली असून, प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला आहे.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा झाली. या सभेला मोठी गर्दीदेखील होती. आदित्य ठाकरे यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गीते यांनीदेखील शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांवर हल्लाबोल केला. मात्र, ही सभा सुरू असताना शिंदे गटाने शिवसेनेला चंगलाच झटका दिला. गट मजबूत करण्याच्या दृष्टीने शिंदे गटाची वाटचाल सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत पाऊल ठेवताच शिवसेनेचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, नावडी विभागप्रमुख महेश देसाई, रत्नागिरी तालुका संपर्कप्रमुख मंगेश साळवी, माजी जिल्हा परिषद सभापती सहदेव बेटकर आणि जयगड विभागप्रमुख अनिकेत सुर्वे हे शिंदे गटात डेरेदाखल झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

यापैकी अनिकेत सुर्वे यांनी आपला राजीनामादेखील तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना पाठवला आहे. तालुका संपर्कप्रमुख मंगेश साळवी यांच्याशी चर्चा केली असता मात्र त्यांनी गुरुवारी (ता. १५ सप्टेंबर) याचा इन्कार केला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा एकदा शिंदे गटाकडून हा दावा करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT