Snehal Jagtap -Uddhav Thackeray
Snehal Jagtap -Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

भरत गोगावलेंना पराभूत करण्याची रणनीती ठरली; कट्टर विरोधक जगतापांना ठाकरेंकडून पाठबळ!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलेले महाडचे आमदार भरत गोगावले (bharat gogawale) यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून आखण्यात आली आहे. त्या दृष्टीने टाकलेले पाऊल म्हणजे गोगावले यांचे कट्टर विरोधक माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची घेतलेली भेट. गोगावलेंना आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जगताप यांना ठाकरे यांच्याकडून बळ दिल्यास वावगे ठरणार नाही. भविष्यात जगताप ह्या शिवसेनेकडून निवडणूकही लढवू शकतात, अशी चर्चा या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Snehal Jagtap meet Uddhav Thackeray)

स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. काँग्रेस मातब्बर नेते, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत. स्नेहल जगताप आणि हनुमंत जगताप यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पाऊले उचलली जात आहेत. संबंधित आमदारांच्या मतदारसंघात भक्कम पर्याय देण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्याकडून होताना दिसत आहे. त्यासाठीच स्नेहल जगताप यांना मातोश्रीवरून चार ते पाच वेळा बोलावे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. त्या निमंत्रणावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भविष्यात त्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असे मानले जात आहे.

या भेटीसंदर्भात बोलताना स्नेहल जगताप यांनी राजकीय भाष्य करणे टाळले आहे. मात्र, ही सदिच्छा भेट होती, असे जगताप यांनी सांगितले आहे. मात्र, जगताप यांच्या हाती मशाल देत आमदार गोगावले यांना आव्हान देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे. आमदार गोगावले हे माणिकराव जगताप यांचा पराभव करूनच विधानसभेत पोहोचले आहेत, त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न स्नेहल जगताप यांच्याकडून भविष्यात होऊ शकतो.

बंडखोर आमदारांना धडा शिकविण्याचा चंग शिवसेनेकडून बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने उद्धव ठाकरेंकडून जगताप यांना पाठबळ देऊन गोगावले यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याची रणनीती ठाकरे यांच्याकडून राबवले जाण्याची अधिक शक्यता आहे. गोगावले हे २००९ पासून महाडचे आमदार आहेत. त्यांना पराभूत करायचे असेल तर त्याच तोडीचा नेता हवा म्हणून त्या दृष्टीकोनातूनच स्नहेल जगताप यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT