Raigad Politics; ncp leader sudhakar ghare Sarkarnama
कोकण

Raigad Politics : 'AB फॉर्म नको, साहेबांचा फक्त हातच बसं; 2029 साठी तयार रहा! तटकरेंच्या शिलेदाराचं शिवसेनेच्या आमदाराला ओपन चॅलेंज

Sudhakar Ghare Challenges Karjat MLA Mahendra Thorve For Election : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू झाला असून खासदार तटकरेंवर होणाऱ्या टीकेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उत्तर दिले आहे. तसेच आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान दिल आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांना राजीनामा देण्याचे आव्हान देणाऱ्या महेंद्र थोरवेंना सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "दुसऱ्यांचा राजीनामा मागण्यापूर्वी आधी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्या. मुलाला कशाला, तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरा. २९ तारखेला तुमची हौस पूर्ण करू," अशा शब्दांत घारे यांनी थोरवेंना खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि खालापूरमधील एका कारखान्याशी संबंधित मुद्द्यांची पार्श्वभूमी आहे. या प्रकल्पांवरून आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली होती. तसेच विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या वादात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनीही तटकरेंविरोधात भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिकच वाढला आहे.

३ नोव्हेंबर २०२६ रोजी पोसरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना थेट आव्हान दिले होते. "एवढीच खुमखुमी असेल, तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या. मी माझ्या मुलाला तुमच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे करतो," असे आक्रमक विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे रायगडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली होती.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची राजकीय स्थिती तपासावी, असा टोला त्यांनी लगावला. दुसऱ्यांचा राजीनामा मागण्याऐवजी महेंद्र थोरवे यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान घारे यांनी दिले.

"साहेबांचा फक्त डोक्यावर हात असू द्या, मग एबी फॉर्म असो किंवा नसो, २९ तारखेला तयार राहा. चितपट करण्याची ताकद आमच्यात आहे," असे म्हणत घारे यांनी थोरवेंना थेट निवडणुकीचे आव्हान दिले. कर्जतच्या आमदारांनी तटकरे कुटुंबीयांवर टीका करताना विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. थोरवे यांच्यावर टीका करताना त्यांनी, "त्यांना आम्ही भुईसपाट केले आहे," असा दावाही केला.

अनिकेत तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत घारे यांनी २०१७ मधील निवडणुकीची आठवण करून दिली. त्या वेळी शिवसेना आणि भाजप एकत्र असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला होता, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी थोरवेंना लगावला.

याशिवाय, आगामी निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून देऊ नये, अशी विनंतीही घारे यांनी तटकरे यांना केली. थोरवे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, "मुलाला कशाला, तुम्ही स्वतःच निवडणुकीला उभे राहा. २९ तारखेला तुमची ही हौस पूर्ण करू," असा टोला घारे यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांनी स्वतः पक्षप्रमुखपद काढून थोरवे यांच्याकडे दिले आहे, असा त्यांचा समज झाल्याचे दिसते, अशा शब्दांत घारे यांनी आणखी एक राजकीय टोला लगावला. याचवेळी आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांच्या मताधिक्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली.

दरम्यान, सुधाकर घारे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांनी २०२४ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये घारे यांनी थोरवे यांना पराभूत केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांना दिलेल्या थेट आव्हानाला रायगडच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT