Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi sarkarnama
कोकण

Raigad Political War : तटकरे-दळवी वाद पुन्हा चव्हाट्यावर; नाव न घेता तटकरेंवर साधला पुन्हा निशाणा, 'येणारा काळ शिवसेनेचाच'

Mahendra Dalvi Targets Sunil Tatkare : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यातील राजकीय वाद अद्याप संपलेला नाही.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद अद्याप शांत झाला नसून, तो वाढतच आहे. खासदार सुनील तटकरे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून, 'मी बैलगाडीचा बादशहा आहे. त्यामुळे कोणत्या वेळी कोणता बैल बदलायचा, हे मला माहीत आहे,' असा खोचक टोला दळवी यांनी तटकरेंना लगावला आहे. यावरून पुन्हा एकदा रायगडचे राजकीय वातावरण तापले असून, दळवी यांनी केलेल्या दाव्याची चर्चा होत आहे.

अलिबाग येथे शनिवारी (ता. २९) शिवसेनेच्या वतीने गोविंदा सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शहाजीबापू पाटील, महेंद्र थोरवे यांच्यासह रायगडमधील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गोविंदा सराव शिबिराच्या माध्यमातून शिवसेनेने अलिबागमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आमदार दळवी यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले असून, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी तटकरेंचे नाव न घेता, 'येणारा काळ हा शिवसेनेचा आहे. मागील निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला असता, तर शिवसेनेचा आणखी एक आमदार निवडून आला असता,' असा दावाही केला.

दरम्यान, दळवी यांच्याकडून तटकरेंवर सातत्याने होणाऱ्या टीकेकडे आगामी राजकीय समीकरणांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी 'रायगडचा आगामी खासदार शिवसेनेचाच असेल,' असे सूचित केल्यानंतर आता 'येणारा काळ शिवसेनेचा आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

'मागील निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला असता, तर शिवसेनेचा आणखी एक आमदार झाला असता,' असे सांगत दळवी यांनी मागील निवडणुकीतील राजकीय गणितांवरही भाष्य केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

'सरोगसी बाळ'

दरम्यान, दळवी यांच्याकडून खासदार सुनील तटकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्यावरही सातत्याने टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी दळवी यांनी अनिकेत तटकरे यांचा 'सरोगसी बाळ' असा उल्लेख करीत टोला लगावला होता. आता 'बैलगाडीचा बादशहा' आणि 'बैल बदलण्याच्या' वक्तव्यामुळे दळवी यांनी पुन्हा तटकरे यांना लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT