

Raigad Political News : रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी आपल्या विधानसभा समन्वयकपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, नव्या वादाला देखील तोंड फुटले आहे.
या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घोषणेचा देखील समाचार घेतला आहे. यामुळे रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती सुरूच असून, विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी पक्षाला रामराम ठोकला. तसेच पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. यानंतर ओझर्डे यांनी आज (रविवारी) आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तटकरे यांनी ओझर्डे यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच तटकरे यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात नवरात्रीनंतर मेळावा घेण्याची घोषणा केली.
या घोषणेनंतर आता रायगडचे राजकारण चांगलेच तापले असून, नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या घोषणेवर तटकरेंचा समाचार घेत थेट प्रत्युत्तर दिलं आहे. दळवी यांनी, घारे, ओझर्डेंपेक्षा आमच्याकडे मातब्बर नेते असल्याचा दावा करत तटकरे यांचं राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत झालं आहे. तेच आता आपलं स्थान स्थिर करण्याचा प्रयत्न करत असून, त्यातलाच हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा टोला लगावला आहे. तसेच रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचेदेखील दळवींनी ठणकावून सांगितलं आहे.
दरम्यान, रायगडच्या राजकारणात तटकरे यांनी एकाच खेळीमध्ये दोन राजकीय उद्दिष्टे साध्य केली आहेत. एकीकडे ठाकरेंच्या स्थानिक नेत्याला फोडत शिवसेना कमकुवत केली आहे. तर दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. तर ओझर्डे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तटकरे यांनी ओझर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
ओझर्डे यांच्या या प्रवेशामुळे महाडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, भविष्यात गोगावले विरुद्ध ओझर्डे असा नवा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना देखील आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.