Raigad Political Controversy Latest News : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले पालकमंत्री झाले आहेत. यानंतर महायुतीतील अंतर्गत वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू झाली होती. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील गोगावले यांना शुभेच्छा देत या वादावर पडदा टाकत संयमी पवित्रा घेतला होता. पण आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. कधी कधी वक्ता काय बोलतो यापेक्षा विद्यमान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून काय बोलू नये, यातून आपले जनमत वाढते, असा खोचक टोला लगावला आहे.
किल्ला येथे रोहा तालुका व रोहा अष्टमी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे भाष्य केलं आहे. यावेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, विजया पाशिलकर, विजय मोरे, विनोद पाशिलकर, वनश्री शेडगे, समीर शेडगे, अनंत देशमुख, अॅड. मनोजकुमार शिंदे, प्रमोद म्हसकर, समीर सकपाळ आदी उपस्थित होते.
गेल्याच महिन्यात रायगड, नाशिक जिल्ह्यांच्या रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला. रायगडची माळ मंत्री गोगावले यांच्या गळ्यात पडली असून नाशिकची जबाबदारी गिरीष महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला.
मात्र, या नियुक्तीनंतर एकीकडे नाशिकमध्ये कोणतेच वाद समोर आले नाहीत. मात्र, रायगडमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पालकमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याचा डाव तटकरेंनी खेळला, असा आरोप दळवींनी केला होता. तर पुढच्या वेळी रायगडात भगवाच फडकेल, असा दावा ही त्यांनी केला होता. तर आमदार अनिकेत तटकरे यांचा राजकारणातील सरोगसी बाळ असा उल्लेखदेखील केला होता. या शब्दावरून सध्या रायगडचे राजकारण चांगलेच तापले असून, दळवींनी घेतलेल्या रोह्यातील दहीहंडीवरूनदेखील आता वाद पाहायला मिळत आहे.
या सर्व घडामोडींवरून तटकरे यांनी आता जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी, राजकारण करत असताना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागते. परिस्थितीनुसार कधी आक्रमक तर कधी सावध भूमिका घ्यावी लागते, असा सल्ला दिला आहे. वक्ता कधी कधी काय बोलतो, यापेक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून काय बोलू नये, हे ठरवले पाहिजे. यातूनच आपले जनमत वाढते. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याकडे केवळ १३४ मते असल्यावरून उमेदवारी देण्यावरून काहींनी विरोध केला होता.
पण आपण मात्र संयम ठेवला आणि त्या सबुरीचे फळ आपल्याला मिळाल्याचे मत तटकरेंनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचे नाव न घेता व्यक्त केले. तसेच राज्यात सर्वाधिक १३ कोटी ८० लाख रुपये निधी रोहे तालुक्यातील लांढर वाशी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी दिला. मात्र, काही मंडळी समाधानी नसल्यावरून तटकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.