Raigad Guardian Minister Controversy : कोकण विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, रायगडच्या राजकीय वर्तुळात नवा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा या बिनविरोध निवडीनंतर सुटणार अशी चर्चा असतानाच, आता महायुतीमध्ये यावरून उघड नाराजी आणि वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या विधानावर तटकरे चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नेमका वाद काय?
कोकण विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने संख्याबळ असूनही जागा राष्ट्रवादीला सोडली आणि अनिकेत तटकरे बिनविरोध आमदार झाले. या बदल्यात 'रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला सोडण्याच्या अटीवरच' तटकरे यांच्यासाठी शिवसेनेने जागा सोडली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. परंतु, अनिकेत तटकरे यांची निवड होताच सुनील तटकरे यांनी युटर्न घेतला असून, "अशी कोणतीही डील झाली नव्हती, पालकमंत्री पदाचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील," असे सांगत आपला दावा सोडण्यास नकार दिला आहे.
दिलेला शब्द पाळावाच लागेल; उदय सामंतांचा शिवसेनेकडून दबाव :
या घडामोडींनंतर शिवसेनेकडून दबाव वाढवला जात असून, मंत्री उदय सामंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. सामंत म्हणाले, "कोकणची जागा आता बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे भरतशेठ गोगावले यांनाच रायगडचे पालकमंत्री करावे, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. केवळ निवडणुकीपुरतीच ही चर्चा मर्यादित नव्हती. जो शब्द दिला गेला होता, तो आपल्या सर्वांना पाळावाच लागेल. जागा बिनविरोध झाली म्हणून दिलेला शब्द विसरून चालणार नाही."
...अन् सुनील तटकरे कॅमेऱ्यासमोर संतापले!
उदय सामंत यांच्या या विधानावर प्रसारमाध्यमांनी सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला, तेव्हा ते चांगलेच भडकले. अत्यंत आक्रमक स्वरात तटकरे म्हणाले, "या विषयावर मी कालपासून ५० वेळा बोललो आहे. आता पाचव्या मिनिटाला कोण काय बोललं, म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया द्यावी अशातला काही भाग नाही."
ते पुढे म्हणाले, "याआधीही मी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी स्वतः एकत्र बसून यावर चर्चा करू. चर्चा करून यावर एक निकोप मार्ग काढला जाईल. त्यामुळे वारंवार या एकाच विषयावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही."
सामंतांचे नाव घेत अप्रत्यक्ष टोला :
सुनील तटकरे यांनी उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले, "उदय सामंत हे महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत आणि कोकणातील शिवसेनेचे नेतृत्व करतात. आमच्यातील समन्वयाचे काम तेच पाहतात." मात्र, समन्वयाचे काम करणाऱ्या नेत्यानेच जाहीर वक्तव्ये केल्यामुळे तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे आपली तीव्र नाराजी जाहीर केली आहे.
राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा :
अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा आनंद साजरा होत असतानाच, रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत (शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी) ठिणगी पडली आहे. आता शिवसेना आपला आग्रह कायम ठेवणार की तटकरे यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे नमती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.