Kokan Political News : कोकणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेमुळे कोकणातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. अशातच पुन्हा एकदा तटकरे यांनी कदमांवर कठोर शब्दांत पलटवार करत, "यापुढे रामदास कदम यांना मी कधीही 'भाई' म्हणणार नाही," असे म्हटले आहे.
कोकण विधान परिषदेच्या झालेल्या बिनविरोध निवडीवरून रंगलेले नाराजी नाट्य संपत नाही, तोच पुन्हा एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
ज्यानंतर तटकरे यांच्याकडूनही याला उत्तर देण्यात आले. तर या वादात राज्यमंत्री तथा रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी उडी घेत तटकरेंवर निशाणा साधला. या सर्व घडामोडीनंतर तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत कदमांवर कठोर शब्दांत पलटवार केला आहे. रोह्यातील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तटकरे यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला. तसेच, "मी रामदास कदम यांना यापुढे कधीच 'भाई' म्हणणार नाही," अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला. या पलटवारानंतर आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अलीकडे रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
काय म्हणाले होते कदम?
कदम यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, एहसानफरामोश आणि गद्दार असे म्हटले होते. तर ते कुणाचेही होऊ शकत नाहीत, जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेंची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे, असे एकेरी शब्दांत टीका केली होती. "माझ्या घराला गटार म्हणता, मग दहा वर्षे याच गटारात कशाला येत होतात?" असा सवालदेखील केला.
लोकसभेला पाठीला जखम असतानाही तटकरेंचा प्रचार केला. मात्र, त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात गद्दारी केली. आता गटार काय असते, हे भविष्यात दाखवून देऊ, असा इशारा दिला. तसेच, मंडणगड पाणी योजनेवरून तटकरेंना टोला लगावला होता. "दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका," असा सल्ला कदम यांनी तटकरेंना दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.