TDRF Jawan Dies in Pothole Accident : आपत्तीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) मधील जवानाचा एका रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विकास लहू गोरे (वय 31) असे मृत जवानाचे नाव असून, शहापूर तालुक्यातील बामणे येथून ठाण्यात कर्तव्यावर जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलाजवळ त्यांच्या बुलेटचा भीषण अपघात झाला.
या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रस्त्यावरील खड्डाच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ठाणे (Thane) शहरातून गेलेल्या महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
विकास गोरे हे सोमवारी सकाळी आपल्या बामणे येथील घरातून बुलेटवरून ठाण्यातील ड्युटीसाठी निघाले होते. मुंबई (Mumbai)-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील चाक रस्त्यातील मोठ्या खड्ड्यात आदळले. त्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटून ते दुभाजकावर जोरात आदळले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विकास गोरे हे ठाणे महानगरपालिकेच्या Thane Disaster Response Force (TDRF) मध्ये कार्यरत होते. इमारत दुर्घटना, पूर, भूस्खलन, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बचावकार्य करण्याचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले होते.
सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या बचाव मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. इरशाळवाडी दुर्घटना, तळिये भूस्खलन आणि नुकत्याच झालेल्या भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेतील बचावकार्यातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचाच मृत्यू एका खड्ड्यामुळे झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच विकास गोरे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. कारवाईची ठोस घोषणा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. या भूमिकेमुळे प्रशासनावरही दबाव वाढला आहे.
विकास गोरे यांच्या निधनानंतर ठाणे महापालिकेने त्यांच्या कुटुंबासाठी मदतीची घोषणा केली आहे. महापालिकेच्या विमा योजनेतून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी दिली. याशिवाय गोरे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ठाणे महापालिकेत नोकरी देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत लवकरच बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर शहरातील आणि परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न महापालिकेने गांभीर्याने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळा अद्याप सुरू असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. "खड्ड्यांमुळे आणखी कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल," असे महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.