Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi Sarkarnama
कोकण

Diveagar Tragedy : शिक्षकांना सहल भोवली, आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; निष्काळजी अन् बेजवाबदारपणाचा ठपका

Alandi Students Death Case : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमीच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे गेली होती.

Aslam Shanedivan

Raigad Crime News : दिवेआगर समुद्रकिनारी बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेप्रकरणी आळंदी येथील विनर्स अॅकेडमीच्या संस्थापक शिक्षकांसह पाच जणांविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमीच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल १ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आली होती. या सहलीत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर संबंधित व्यक्ती अशा एकूण ४८ जणांचा समावेश होता. सहलीदरम्यान समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर दिघी सागरी पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सहलीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींची चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना रायगड किल्ला पाहण्यासाठी नेण्याचे नियोजन होते. किल्ल्यावर जाण्यासाठी रोप-वेसाठी प्रतिव्यक्ती तिकिटाचे पैसे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले होते. मात्र, रोप-वे बंद असल्याने विद्यार्थ्यांना पायरीमार्गे किल्ल्यावर नेण्यात आले. त्यानंतर श्रीवर्धन समुद्रकिनारी जाण्याचे नियोजन असताना शिक्षक आणि इतर संबंधितांनी दिवेआगर समुद्रकिनारी जाण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

सायंकाळी सर्वजण दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचले. विद्यार्थ्यांना पोहता येत नसल्याची माहिती असतानाही त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. याचदरम्यान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आवश्यक व्यवस्था न करता त्यांना समुद्राच्या पाण्यात खेळण्यासाठी पाठविल्याने निष्काळजीपणा झाल्याचा आरोप विनर्स अॅकेडमीचे संस्थापक शिक्षक अमर आडक यांच्यासह पाच जणांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्घटनेमुळे शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे. प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच जबाबदारी निश्चित होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT