Vinayak Raut Sarkarnama
कोकण

Thackeray Group News : चुकलं असेल तर, माफ करा; ठाकरेंच्या खासदारावर भर सभेत विनंती करण्याची वेळ?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Latest News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आताच्या गद्दारांना झोपेतून उठले की रोज सकाळी लांजा आणि राजापूर दिसते. पूर्वी रात्रीची स्वप्नं पडायची. पण आता दिवसाही स्वप्नं पडतात, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या संगमेश्वर येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत बोलत होते. पूर्वीच्या मोगलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे आता या गद्दारांना लांजा, राजापूर येथे राजन साळवी दिसतात. लोकसभा आणि विधानसभेला राजन साळवी असतील. लोकसभेला आम्ही आहोत. मोगलांसारखे गद्दारांना चिरडून टाकू, अशा शब्दांत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या महायुतीला त्यांनी इशारा दिला.

काम करत असताना जर का काही राहून गेले असेल, चुकले असेल तर, माफ करा. पण तुम्ही आपल्या माणसांना कधी दूर करणार नाही, याची मला खात्री आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी विनंती केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार विनायक राऊत यांच्यावर विनंती करण्याची वेळ का आली? हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

सत्तेसाठी अनेक योजना सांगत गाड्या फिरवतील. मग उज्ज्वला गॅस सांगतील, लाईट सांगतील, अशी जोरदार टीका भाजपच्या संकल्प रथ यात्रेवर राऊत यांनी केली. सह्याद्रीच्या पायथ्याजवळ असलेला संगमेश्वरचा संपूर्ण डोंगर अदानीच्या घशात घालण्यात आला आहे. काही दलालांना हाताशी धरून कधी अदानीच्या नावावर करण्यात आला आहे, हे या लोकांनाही कळले नाही. हे आम्ही शोधून काढले आणि अदानीच्या घशातून कुंडी निगुडवाडी आणि बाजूचे सगळे गाव लोकांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न आम्ही केले, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण विश्वगुरू असल्याचे ते सांगतात. पण या भागात मोदी सरकारची गाडी आली तर, त्यांना जाब विचारा. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या खाली भारतीय अर्थव्यवस्थेचा नंबर का लागतो? आपल्यापेक्षा स्वस्ताई श्रीलंका, बांगलादेशमध्ये आहे. आपल्याकडे महागाई वाढली तरीही मोदीसाहेब म्हणतात मी जबरदस्त स्वस्त केले. लोकांच्या हितासाठी हे केले. ही सगळी थापेबाजी आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

Edited by Sachin Fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT