Thane District Water Crisis; Ganesh Naik Sarkarnama
कोकण

Water Crisis : ठाणे जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर दोन नव्या धरणांची घोषणा; 2031 पर्यंत पाणी उपलब्ध होणार – गणेश नाईक

Ganesh Naik Announces Two New Dams For Thane District Water Supply : ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन नवी धरणे उभारण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी केली असून, या प्रकल्पांतून २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

Thane News : ठाणे जिल्ह्यात वाढते नागरीकरण, मोठ्या प्रमाणावर उभारले जाणारे गृहप्रकल्प आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही सातत्याने वाढत आहे. मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत पाणीपुरवठ्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुशीर आणि शिलार येथे दोन नव्या धरणांची घोषणा केली आहे. या धरणांमधून २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

ठाणे शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत वेगाने होत आहे. घोडबंदर रोड परिसरासह शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी, लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, पाणीपुरवठ्यावरही त्याचा मोठा ताण पडत आहे. अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.

या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुशीर आणि शिलार येथे दोन धरणे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही धरणांची क्षमता प्रत्येकी १००० MLD असल्याचे सांगण्यात आले असून, २०३१ पर्यंत या प्रकल्पांमधून पाणी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

कुशीर आणि शिलार धरणांमुळे कोणत्या शहरांना मिळणार पाणी?

कुशीर धरणातून नवी मुंबई, पनवेल, खालापूर आणि खोपोली या शहरांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तर शिलार धरणातील पाणी ठाणे शहरासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे या शहरांमधील वाढत्या पाण्याच्या गरजेला भविष्यात काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालू धरणाचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू असून, या प्रकल्पातून मिळणारे पाणी ठाणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याच्या नियोजनातील दिरंगाईवर मंत्री नाराज

ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण आणि गृहप्रकल्पांची संख्या लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच करणे गरजेचे होते. मात्र, यापूर्वीच्या प्रशासकांकडून आणि महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना वेळेत करण्यात आल्या नाहीत, याबद्दल गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरांमध्ये भविष्यात पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुशीर आणि शिलार धरणांचे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊन २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध झाले, तर वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT