Ganesh Naik : मंत्रालय परिसरात खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावनगड’ बंगल्याला भीषण आग! कारणही आलं समोर

Minister Ganesh Naik Bunglow Fire : राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या पावनगड या शासकीय बंगल्याला आग लागली असून एकच खळबळ उडाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
Maharashtra Forest Minister Pawangad Government Bungalow Fire; Ganesh Naik
Maharashtra Forest Minister Pawangad Government Bungalow Fire; Ganesh NaikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : दिवाळीच्या सणात राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या ‘पावनगड’ या शासकीय बंगल्यात ही आग लागली. एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बंगल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या मंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावनगड’ या शासकीय बंगल्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. बंगल्यातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याचे समजताच बंगल्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी वनमंत्री गणेश नाईक बंगल्यात उपस्थित नव्हते. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग ‘लेव्हल वन’ स्वरूपाची होती. एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आग पूर्णपणे आटोक्यात आली असून घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती गणेश नाईक यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आगीमुळे बंगल्याचे नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून एसीमधील शॉर्ट सर्किट हेच आगीचे मुख्य कारण होते का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, मंत्रालयासमोरील याच परिसरात मंत्री गणेश नाईक यांच्यासह मंत्री आदिती तटकरे, नितेश राणे, सचिन अहिर आणि दादा भुसे यांचे शासकीय बंगले आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालयेही याच परिसरात आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रालय परिसरातील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.