Pradeep Purnekar Sarkarnama
कोकण

Pradeep Purnekar murder case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; जुन्या वैमनस्यातून हत्या, सूत्रधाराचा शोध सुरूच

Two accused have reportedly linked murder past corporator election rivalry, alleged mastermind and financial trail remain under investigation : नगरसेवकपदाच्या निवडणुकीवरून वैमनस्य असल्याची अटकेतील आरोपींची कबुली; सुपारी कोणी दिली आणि आर्थिक रसद कोणी पुरवली, याचा तपास अद्याप बाकी.

Pradeep Pendhare

Pradeep Purnekar murder investigation : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे नगरसेवकपदाच्या निवडणुकीवरून असलेले जुने वैमनस्य असल्याची कबुली अटकेतील संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह उर्फ पपलू या दोघांनी उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाकडे (एसटीएफ) दिल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे.

मात्र हत्येची सुपारी कोणी दिली, त्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली आणि कटाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आरोपींच्या अटकेनंतरही हत्येमागील सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

संतोष कनोजिया आणि अमित सिंह या दोघांना शुक्रवारी प्रयागराज येथून अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून यूपी एसटीएफच्या प्रयागराज पथकाने ठाणे (Thane Police) गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या पत्रकातून या कारवाईची माहिती देण्यात आली. नगरसेवकपदाच्या निवडणुकीवरून जुन्या वैमनस्यातून साथीदारांच्या मदतीने ही हत्या करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दोघांच्या अटकेमुळे पूर्णेकर हत्याकांडाच्या (Murder) तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे; मात्र हत्येचा कट कुठे आणि कसा रचण्यात आला, सुपारी कोणी दिली, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. अटकेतील आरोपींकडून मिळणारी माहिती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी यांमधून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागणार आहे.

हत्या प्रकरणातील आरोपी पप्प्या शिंदे, निखिल यादव आणि नीतेश पवार यांना मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पप्प्या शिंदे याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर निखिल यादव आणि नीतेश पवार यांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली.

पोलिसांकडून शिंदे दाम्पत्याची चौकशी

प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने आणि भावाने काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना मंगळवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT