Jal Jivan Yoyana : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल ही योजना राबविली जात आहे. ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलजीवन मिशन हाती घेण्यात आले आहे. २०२४ पर्यंत 'हर घर नल से जल' हा मानस डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी खेड तालुका पंचायत समितीमध्ये आज (बुधवार) जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अधिकारी व ठेकेदार यांची बैठक सुरु होती. या बैठकीच्या वेळी ठाकरे गटाच्या नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भर बैठकीत गोंधळ घातला. यामुळे काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे पंचायत समिती कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसेल असे सांगण्यात आले होते.
मात्र, या बैठकीत अधिकाऱ्यांनी ठाकरे गटातील माजी आमदार संजय कदम आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसवून बैठक सुरु केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धावडे आक्रमक झाले. या प्रकरणात त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचवेळी संजय कदम यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही गटामध्ये वादावादी सुरु झाली.
दोन्ही गटामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे, काही काळ पंचायत समिती आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील हा गोंधळ हमरी- तुमरीवर आला. या राड्यामुळे संजय कदम अधिकाऱ्यांवर संतापले आणि खडे बोल सुनावत बैठकीतून निघुन गेले.
दरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा जमाव वाढल्याने खेड पंचायत समिती आवारात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली. या बैठकीमध्ये सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जल जीवन अभियानांतर्गत सर्व गावकऱ्यांना नळपाणी उपलब्ध करून देण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, या गोंधळामुळे जलजीवन मिशनची बैठक ही अर्ध्यातच संपवण्याची नामुष्की पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर आली.