Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टोरंट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला भाजप आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून पाठिंबा दिला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांसह सत्ताधारी भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच हा प्रकल्प नको आहे. त्यांनी याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले असून राजीनामासत्र सुरू झाले आहे.
उत्तर रायगड किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हसकर यांनी वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत भाजपच्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ही घटना ताजी असतानाच भाजपमधील आणखी एका कार्यकर्त्याने राजीनामा दिला आहे. नेरळ युवा मोर्चा मंडळाचे सरचिटणीस आणि कर्जत तालुका युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस संदेश सुदाम कराळे यांनी भाजपच्या सर्व पदांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट ऊर्जा प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात असल्याच्या मुद्द्यावरून येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना या प्रकल्पावरून एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
यापूर्वीही तीन भाजप पदाधिकाऱ्यांनी याच मुद्द्यावरून राजीनामे दिले आहेत. उत्तर रायगड किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हसकर यांनी या मुद्द्यावरून पक्षाची साथ सोडली होती. तर पर्यावरणाचा ऱ्हास आणि सह्याद्रीच्या जंगलांचे संभाव्य नुकसान याविरोधात भूमिका घेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी आणि कर्जत तालुका चिटणीस मिनेश मसणे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. या राजीनाम्यांची चर्चा सुरू असतानाच आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. नेरळ युवा मोर्चा मंडळाचे सरचिटणीस आणि कर्जत तालुका युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस संदेश सुदाम कराळे यांनी भाजपच्या सर्व पदांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
संदेश कराळे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट ऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली जंगलतोड, सह्याद्रीच्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, निसर्गसंपत्तीचे नुकसान आणि स्थानिक जनतेच्या भावनांकडे होणारे दुर्लक्ष या बाबी अत्यंत चिंताजनक आहेत.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जात असून, भविष्यात लाखो झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सह्याद्रीचे अस्तित्व आणि पर्यावरण धोक्यात येऊ शकते. सह्याद्री, जंगल, वनसंपदा आणि पुढील पिढ्यांचे भविष्य जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचा बळी दिला जात असेल, तर त्याविरोधात भूमिका घेणे आवश्यक आहे. या विषयावरील माझी वैचारिक भूमिका आणि पक्षाची भूमिका यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे संदेश कराळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.