Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Eknath Shinde : राष्ट्रवादी, शिवसेना व्हाया भाजपकडे वाटचाल! शिंदेंचा मोठा नेता 'कमळा'वर निवडणूक लढविणार?

Akshay Sabale

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व्हाया एकनाथ शिंदे यांची शिवसेना, असा मंत्री उदय सामंत यांचा राजकीय प्रवास. मात्र, उदय सामंत हे पुन्हा नवीन पक्षात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्याचं कारण ठरलं शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार राजन साळवी यांनी केलेलं विधान.

"उदय सामंत हे 2024 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढतील," असा मोठा दावा आमदार साळवी ( Rajan Salvi ) यांनी केला आहे. आमदार साळवी यांच्या विधानंतर कोकणासह महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

आमदार साळवी यांनी उदय सामंत ( Uday Samant ) यांना रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत करण्याचा विडाही उचलला आहे. त्यामुळे उदय सामंत भाजपकडून लढणार का? आमदार साळवी यांनी केलेला दाव्यावर काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राजन साळवी काय म्हणाले?

"2014 आणि 2019 मध्ये राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं. 2019 मध्ये निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामंत यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री केलं. एवढे देऊन सुद्धा सामंत उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसून शिंदे गटात गेले. आता 2024 मध्ये सामंत हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील," असं भाकीत आमदार साळवी यांनी व्यक्त केलं आहे.

"सामंत ना शरद पवारसाहेबांचे झाले ना उद्धव ठाकरे यांचे. आता ते एकनाथ शिंदे यांचेही होऊ शकणार नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत यांना पराभूत करणार," असा निर्धार आमदार साळवी यांनी व्यक्त केला.

"शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेता आणि तीनवेळा आमदार मी आहे. एका पक्षात, एका नेत्याच्या आणि एका झेंड्याच्या नेतृत्वाखाली मी 40 वर्षांचा प्रवास केला आहे. 24 पैकी 20 तास मी काम करतो. उदय सामंत हे स्वत:साठी पक्ष बदलत गेले. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मला अनेक प्रलोभने दिली गेली. चौकशा लावण्यात आल्या. पण, माझ्याकडून कधीही गद्दार झाली नाही आणि होणार नाही. उदय सामंत यांनी मला निष्ठेबद्दल शिकवू नये. 2024 ला राजन साळवी विजयाचा चौकार मारणार," असं आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT