Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
कोकण

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत आरे गेस्ट हाऊसमध्ये काय करत होते? नितेश राणेंच्या सवालाने खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane on Sanjay Raut : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) निकाल दिला. न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला असला तरी दरम्यान झालेल्या सर्व घडामोडींकडे लक्ष वेधले. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी देण्याचा प्रयत्न केले असते. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालानंतर ठाकरे गट आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

सत्तासंघर्षातील सर्व घडामोडींवर न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे सांगून राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे आणि त्यांच्या सरकारला दिल्लीत पूर्ण नग्न केले. त्यानंतर आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यांनी नेमलेला व्हिप बेकायदेशीर आहे. व्हिपने दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत. तिथेच सरकार हरले आहे. सुनील प्रभूंचा व्हिपच कायदेशीर निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यानंतरही हे नागडे का नाचत पेढे वाटत आहेत."

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांचा आमदार नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण करण्याची राऊतांची क्षमता नाही. त्यामुळे ते त्यांनी करू नये. आता त्यांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी बॅगा भरून तयार ठेवाव्यात." यानंतर राणे यांनी अरे गेस्ट हाऊसचे नाव घेत संजय राऊतांवर मोठे आरोप केले आहेत. त्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, "निकालानंतर आनंद साजरा केला म्हणून राऊत नंगानाच हा शब्द वापरतात. आता त्यांनी हे सांगावे की ते मुंबईतील आरे गेस्ट हाऊसमध्ये काय करत होते? ते कुठल्या प्रकारचा नाच करत होते? त्याबाबतही त्यांनी थोडी माहिती द्यावी. नाहीतर आम्हीच लिंक त्यांना दाखवतो."

राणे यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT