Yuvraj Lakhmraje Bhosale join BJP Sarkarnama
कोकण

राणेंनी केसरकरांपुढे उभे केले कडवे आव्हान; सावंतवाडीच्या लखमराजेंचा भाजपत प्रवेश

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्यासह शिवसेनेचे माजी खासदार माने, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज (ता. २५ एप्रिल) मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan Rane) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या निमित्ताने भाजपने विशेषतः राणे यांनी सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यापुढे आगामी निवडणुकीत तगडे आव्हान उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सावंतवाडी मतदार संघाची गणिते पुढच्या काळात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Yuvraj Lakhmraje Bhosale of Sawantwadi joins BJP)

दरम्यान लखमराजे भोसले यांच्यासह शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोदी यांनीही आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पक्षात स्वागत केले.

येथील राजघराण्याचा पूर्वी जिल्ह्याच्या राजकारणाशी थेट संबंध होता. संस्थानचे तत्कालीन राजे शिवरामराजे भोसले यांनी सगळ्यात आधी १९५७ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवत तब्बल ९२ टक्के मते मिळविली होती. समोर असलेल्या सगळ्या उमेदवारांची अनामत त्यावेळी जप्त झाली होती. त्यावेळी शिवरामराजे अपक्ष म्हणून लढले असले तरी समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांनी त्यांना सक्रिय राजकारणात आणले होते. पुढे १९५८ मध्ये निवडणूक आयोगाकडे झालेल्या तक्रारीमुळे शिवरामराजे जिंकलेली निवडणूक रद्द ठरविण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवरामराजेंच्या मातोश्री तथा तत्कालीन राजमाता राणी पार्वतीदेवी यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. त्यातही त्यांचा विजय झाला होता.

पुढे शिवरामराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढची अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीचे काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. नंतरच्या काळात राजघराणे जिल्ह्याच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. आता युवराज लखमराजे भोसले यांनी राजकारणात पाऊल टाकल्याने या ठिकाणी भविष्यात राजकीय समीकरणांना काही प्रमाणात कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई येथे झालेल्या या प्रवेशावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

युवराज लखमराजे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. आता त्यांनी भाजपकडून थेट राजकारणात उडी घेतली आहे. राजघराण्याला मानणारा मोठा वर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आहे, त्यामुळे युवराजांच्या प्रवेशाचा भाजपला फायदा होऊ शकतो. सावंतवाडीचे नेतृत्व सध्या शिवसेनेचे दीपक केसरकर करत आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपचे गेली दोन निवडणुकांमध्ये जोरदार प्रयत्न सुरू होते. पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने युवराज लखमराजे यांचा प्रवेश भाजपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT