Raigad Teacher Recruitment News : अमित गवळे
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे ३५१ उपशिक्षक पदांची भरती प्रक्रिया मागील आठवड्यात राबवण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे ३४० आणि उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक मिळाले आहेत. या भरतीमुळे काही भागांत दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि सुधागड या सहा तालुक्यांना या प्रक्रियेत पूर्णपणे वगळण्यात आल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. शिवाय या ठिकाणी शून्य शिक्षकी शाळांना देखील शिक्षण देण्यात आलेले नाही.
जिल्ह्यात सध्या मराठी माध्यमाची १,१३९ आणि उर्दू माध्यमाची ७८ पदे रिक्त आहेत. नव्या भरतीनंतरही सुधागडमध्ये ५४, खालापूरमध्ये ३२, पेणमध्ये ९३, कर्जतमध्ये ७२ आणि उरणमध्ये ४० पदे अद्याप रिकामी आहेत. विशेष म्हणजे, या सहा तालुक्यांमध्ये जवळपास २० शाळा 'शून्य शिक्षकी' आहेत.
या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने लगतच्या केंद्र शाळांतून किंवा तात्पुरत्या व्यवस्थेवर शिक्षक पाठवून अध्यापन चालवले जात आहे. या गोंधळामुळे पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात ग्रामस्थ मनीषा कांबळे यांनी सांगितले की, शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आधीच शिक्षकांची टंचाई आहे, त्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली केली जात आहे. यामुळे शाळांमध्ये शिकवायला शिक्षकच उरत नाहीत.
शिक्षक भरती करताना प्रशासनाने सर्व तालुक्यांचा समतोल विचार करणे आवश्यक होते. विशिष्ट तालुके वगळून केवळ काही भागांतच भरती करणे अन्यायकारक आहे. शून्य शिक्षकी शाळांना प्रथम प्राधान्य देऊन शिक्षक न दिल्यास ग्रामीण भागातील शाळा कायमच्या बंद पडण्याचा धोका आहे. खांडपोली येथील सरपंचांनी तर जिल्हा परिषद कामथेकरवाडी शाळेत शिक्षक भरण्यात यावे यासाठी थेट शिक्षण मंत्री यांना तक्रारी निवेदन दिले आहे.- दिपक पवार, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वाघोशी
ज्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची पदे अत्यंत मोठ्या प्रमाणावर रिक्त होती, तिथे या टप्प्यात प्राधान्याने भरती करण्यात आली आहे. शून्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक देण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमधील रिक्त जागा या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत तातडीने भरल्या जातील. तसेच काही जागा समायोजनाने भरल्या जातात.- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
या भरतीमध्ये तालुक्यात एकही शिक्षक भरण्यात आलेला नाही. तालुक्यात शिक्षकांच्या 54 जागा रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक व इतर प्रशासकीय कामांवर ताण येत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा अनेक पालकांच्या तक्रारी येत आहेत.- सादुराम बांगारे, गटाशिक्षणाधिकारी, सुधागड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.