

Pune News: पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती २०२५ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या जाहिरातीनुसार विविध संवर्गांच्या प्रवर्गातील एकूण ४३६ उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) राखीव असलेल्या दहा टक्के जागांसाठी एकूण ३७ उमेदवार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, विवाहित महिला उमेदवारांच्या EWS प्रमाणपत्राबाबत निर्माण झालेल्या अडचणींचा प्रश्न आता प्रशासनासमोर आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे मार्गदर्शन व योग्य सूचना देण्याची विनंती केली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाच्या पत्रानुसार, EWS प्रवर्गातील उमेदवारांमध्ये काही पुरुष उमेदवार आहेत. तसेच काही अविवाहित महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्रांबाबत कोणतीही अडचण नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, ११ विवाहित महिला उमेदवारांनी जाहिरात वर्षातील किंवा TET/CTET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या वर्षातील EWS प्रमाणपत्र म्हणून त्यांच्या पतीच्या कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर केले आहे.
मात्र, सरकारच्या संबंधित निर्णयानुसार कुटुंबाची व्याख्या विचारात घेतल्यास विवाहानंतर पतीचे कुटुंब हे संबंधित महिलेच्या EWS प्रमाणपत्रासाठी आवश्यक ठरू शकते. त्यामुळे या उमेदवारांच्या प्रमाणपत्राबाबत जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
विवाहानंतरच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर आधारित २०२५-२६ या वर्षाचे EWS प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या काही महिला उमेदवारांनाही तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचना देऊन मुदत देण्यात आली आहे. मात्र, संबंधित प्रमाणपत्रांची पूर्तता होईपर्यंत या उमेदवारांचे समुपदेशन घेण्यात येऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे पत्रात नमूद आहे.
काही महिला उमेदवारांनी २०२५-२६ या मागील आर्थिक वर्षाचे EWS प्रमाणपत्र आता काढता येत नसल्याचे ही जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबावी, विवाहित महिला उमेदवारांच्या EWS प्रमाणपत्राबाबत कोणते निकष लागू करावेत आणि समुपदेशन प्रक्रियेत त्यांचा समावेश कसा करावा, याबाबत शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट मार्गदर्शन मागण्यात आले आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम EWS प्रवर्गातून शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या पुढील प्रक्रियेवर होणार असल्याने शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.