महाराष्ट्र

Kumbh Mela Politics: शेतकरी आंदोलन यशस्वी; 'एनएमआरडीए'च्या पाडकामाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Farmers' protest successful, MMRDA action on Trimbakeshwar Road suspended- : आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांशी मुंबईत झाली चर्चा

Sampat Devgire

Nashik News : कुंभमेळ्याच्या रस्ता रुंदीकरणासाठी अनावश्यक पाडकाम बंद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासंदर्भात शेतकऱ्यांचे गेले तीन दिवस सुरू असलेले आंदोलन यशस्वी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही काळासाठी दिलासा मिळाला.

त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा 100 मीटर अंतरावरील घरे आणि व्यावसायिक बांधकामे पाडण्याचे काम सुरू झाले होते. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाला. या संदर्भात आज आमदार हिरामण खोसकर यांसह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने महापालिका हद्दीत जो नियम आहे तोच नियम हद्दीबाहेर लागू करावा. 'एमएमआरडीए' चे सध्याचे निकष तातडीने बदलावे, अशी विनंती केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिका हद्दीपासून त्र्यंबकेश्वर शहरापर्यंत 15 किलोमीटर परिसरात शेकडो शेतकऱ्यांचे घरे आणि बांधकामे पाडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्याबाबत सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आमदार खोसकर आणि आमदार सरोज अहिरे यांच्या पुढाकाराने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाची भेट झाली. यावेळी तानाजी जायभावे यांनी वडिलोपार्जित आणि पन्नास वर्ष जुनी घरे पाडणे योग्य नाही. पंचनामे करून आणि नुकसान भरपाई दिल्याशिवाय पाड काम करू नये, अशी विनंती केली.

महंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज आणि साधूंनी स्थानिक शेतकऱ्यांना बेघर करून कुंभमेळा साजरा करायचा उद्देश नाही. त्यामुळे जेवढी गरज असेल तेवढ्याच रस्ता रुंद करावा. शेतकऱ्यांना उघड्यावर आणू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी तानाजी जायभावे, प्रभाकर खराटे, उत्तमराव खांडबहाले, दिगंबर ढगे, मेघराज गामणे, संपत चव्हाण, निवृत्ती लांबे, नवनाथ कोठुळे यांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावश्यक पाडकाम तातडीने थांबविण्याचा सूचना केल्या. मंत्री गिरीश महाजन यांना दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या. पाहणीनंतर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, अशा सूचना केल्या.

कैलास खांडबहाले यांनी दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. परिसरातील शेतकऱ्यांचा त्याला पाठिंबा मिळाला. आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवली. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. बैठकीनंतर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच एन एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना मंत्री महाजन यांनी फोन करून सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. कोणतेही बांधकाम पाडण्याचे निर्णय घेऊ नये अशा सूचना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT