Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : बहिणींना ओवाळणी मिळणार की खोळंबणार? निवडणूक आयोगाच्या 'त्या' प्रश्नाने खळबळ; हप्त्याबाबत पैशांचा फैसला आज!

Ladki Bahin Yojana payment before elections : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. जाणून घ्या सविस्तर अपडेट.

Rashmi Mane

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या दाव्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने थेट राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने केलेल्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांना पत्र पाठवले असून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. खरोखरच मतदानाच्या आदल्या दिवशी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत का, याची माहिती आयोगाला हवी आहे.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. संदेश कोंडविलकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३ हजार रुपये १४ जानेवारीला महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी करत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अशी आर्थिक मदत देणे हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असून, महिलांना अप्रत्यक्षपणे मतदानासाठी आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आयोगाने सरकारला असे पैसे वितरित करण्यापासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या पत्रानंतर निवडणूक आयोगाने तातडीने हालचाल करत मुख्य सचिवांकडे खुलासा मागितला आहे. आयोगाने आपल्या पत्रात स्पष्टपणे विचारले आहे की, सरकारकडून दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का आणि तो निर्णय नेमका कधी अंमलात आणला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारचे निर्णय नियमांच्या चौकटीत आहेत की नाहीत, याची तपासणी आयोग करत आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लाडकी बहीण योजनेलाच काँग्रेसचा विरोध नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. मात्र, मतदानाच्या अगदी आधीच्या दिवशी दोन महिन्यांचे पैसे देणे योग्य नाही. दुसऱ्या दिवशी मतदान असताना अशी रक्कम खात्यात टाकणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा प्रकार थांबवावा, एवढीच आमची मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आता राज्य सरकार काय भूमिका घेते आणि आयोगाला कोणते उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे वेळापत्रक आणि निवडणूक आचारसंहिता यांचा मेळ बसतो का, यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT