राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मालवण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील पक्ष एकमेकांवर आरोपांचे बाण सोडताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीरातीबरोबरच आरोप–प्रत्यारोपांचा जोर वाढत चालला आहे.
या प्रकरणाची सुरुवात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांपासून झाली. त्यांनी मालवणात भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर अचानक धाडसुद्धा टाकली. या घडामोडीनंतर राजकीय वातावरण आणखीच ढवळून निघाले.
या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत शिंदे मालवणात काय घेऊन आले, असा सवाल उपस्थित केला.
नाशिकमध्येही अशाच प्रकारच्या बॅगा उतरल्या होत्या, आता मालवणातही त्याची पुनरावृत्ती दिसत आहे, असे म्हणत राऊत यांनी लोकशाहीची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप केला. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आणखी वळण देत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही शिंदे आणि निलेश राणे या दोघांवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी शिंदे यांच्या मालवण दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांचे बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. हेच पैसे निलेश राणे यांनी मतदारांना वाटल्याचा त्यांचा आरोप आहे.
दरम्यान, वैभव नाईक यांनी दावा केला आहे की, मालवण दौऱ्यावर येताना शिंदे आपल्या मागे “पैशांच्या बॅगा” घेऊन आले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला असून त्यात शिंदे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे बॅगा दिसत असल्याचा दावा केला जात आहे. नाईक यांचे म्हणणे आहे की या बॅगांमध्ये असलेलेच पैसे मतदारांना वाटण्यात आले.
त्यांनी निलेश राणे यांच्यावरही अशाच प्रकारे मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात सत्तेत असताना भ्रष्टाचारातून मिळविलेला पैसा निवडणुका प्रभावित करण्यासाठी वापरला जात असल्याचा नाईक यांनी आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.